बारामतीकर पुन्हा एकदा गॅसवर; कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होईना

मिलिंद संगई
Saturday, 5 September 2020

शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. गेल्या 24 तासात बारामतीत तब्बल 90 रुग्ण सापडल्याने बारामतीकरांची चिंता कायमच आहे.

बारामती (पुणे) : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. गेल्या 24 तासात बारामतीत तब्बल 90 रुग्ण सापडल्याने बारामतीकरांची चिंता कायमच आहे. बारामतीच्या आकडेवारीने आज 1288 पर्यंत मजल मारली. यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 556 इतकी झाली आहे. आज 90 रुग्ण पॉझिटीव्ह आलेले असले तरी अजूनही 87 जणांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याने बारामतीकर आज ख-या अर्थाने गॅसवर आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीत सोमवारपासून जनता कर्फ्यूची घोषणा झाली आहे. रुग्ण संख्येचा वेगाने वाढणारा आकडा कमी करण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व सभापती नीता बारवकर यांनी काल जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने ही साखळी तोडण्याच्या उद्देशाने परस्परांशी असलेला संपर्क कमी करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

बारामतीत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी प्रयोगशाळा अशा चार ठिकाणी तपासण्या सुरु असल्याने तपासण्यांची संख्याही वाढली आहे. काल बारामतीत 214 आरटीपीसीआर चाचण्या केल्या गेल्या त्यातील 50 पॉझिटीव्ह आल्या आहेत तर 73 निगेटीव्ह आहेत. मात्र, चिंताजनक स्थिती म्हणजे अद्यापही 87 जणांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याने आज उच्चांकी संख्या होण्याची भीती व्यक्त होत आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील 51 तर ग्रामीण भागातील 39 रुग्ण आहेत. सर्वांनी काळजी घेण्याची गरज वैद्यकीय व्यावसायिकांनी बोलून दाखवताना आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1288 corona patients in Baramati