बारामतीत सोमवारपासून 14 दिवसांचा जनता कर्फ्यू

baramati
baramati

बारामती (पुणे) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती शहर व तालुक्यात सोमवारपासून (ता. 7) जनता कर्फ्यू पाळण्याचे  आवाहन नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर यांनी आज केले. गेल्या तीन दिवसात जवळपास 300 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर आज प्रशासन व पदाधिकारी यांच्या तातडीच्या बैठकीत अनेक उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात आला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर आज जनता कर्फ्यूचे आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, मेडीकलची दुकाने, वृत्तपत्रांचे वितरण व दूध सेवा वगळता इतर सर्वांनीच आपापले व्यवहार 21 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन तावरे व बारवकर यांनी एका पत्रकार परिषदेत केले. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी किरणराज यादव या प्रसंगी उपस्थित होते. 

बारामती तालुक्यातील काही गावे कोरोनाबाधित नसली तरीही या गावांनीही जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहर व तालुक्यातील जनतेला हे आवाहन असल्याचे त्यांनी नमूद केले. बारामती तालुक्याची व शहरातून नागरिकांनी बाहेर जाऊ नये व बाहेरच्या नातेवाईक किंवा इतरांना बारामतीत या काळात बोलावू नये, चौदा दिवस पुरेल इतका किराणा, भाजीपाला व आवश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवावा, असे सुचविण्यात आले आहे. 

दरम्यान, अधिग्रहीत केलेल्या दवाखान्यातील जे खासगी डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार नाकारतील त्यांच्यावर पोलिस कारवाईसह त्यांची सनद रद्द करण्याची शिफारस करण्याचा निर्णय आज सकाळी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रशासनाने आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वॅब तपासणी किंवा वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडल्यास व्हॉटसअॅपवर डॉक्टरांची चिठ्ठी किंवा मेसेज असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. 

निर्णयावर व्यापारी नाराज 
महासंघाच्या बैठकीत या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली गेली. बारामतीतील 14 दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय व्यापाऱ्यांना विश्वासात न घेताच घेतल्याचा आरोप बारामती व्यापारी महासंघाने केला आहे. पाच दिवसांचा कर्फ्यू आम्हालाही मान्य होता, मात्र आता कुठे घडी सावरत असताना पुन्हा 14 दिवसांच्या या कर्फ्यूने व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. बंदच करायचा होता तर कंपन्यांना का परवानगी दिली आणि बारामतीसोबतच शेजारचे तालुकेही सील करणे गरजेचे असल्याचे महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी म्हणाले. या प्रसंगी सुशील सोमाणी, प्रवीण आहुजा, महेश ओसवाल, प्रमोद खटावकर, शैलेश साळुखे, स्वप्नील मुथा, किरण गांधी, नरेंद्र मोता आदी व्यापारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com