पीएमपीला संचलन तुटीपोटी १५ कोटी

pcmc
pcmc

पिंपरी - महापालिकेतर्फे पीएमपीला संचलन तुटीपोटी १५ कोटी ८४ लाख रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (ता. १२) घेण्यात आला. दरम्यान, पीएमपीमधून पीएमटी आणि पीसीएमटी या संस्था पूर्वीप्रमाणे स्वतंत्र कराव्यात, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे  केली.

पीएमपीला २०१७-१८ या आर्थिक वर्षांत २०४ कोटी ६२ लाख रुपये संचलन तूट आली. याबाबत महापालिकेने केलेल्या लेखापरीक्षण अहवाल अवलोकनासाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला. त्यानुसार महापालिका ८१ कोटी ८४ लाख रुपये देणार आहे. त्यापैकी ६६ कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित १५ कोटी ८४ लाख रुपये दोन समान हप्त्यांत पीएमपीला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला, अशी माहिती स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी दिली.

महापौर जाधव म्हणाले, ‘‘पीएमपीला गेल्या दहा वर्षांत ६५५ कोटी रुपये दिले. मात्र निर्णय प्रक्रियेत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विचारले जात नाही. शहरात पीएमपी बसगाड्यांची सेवा विस्कळित आहे. बस रोज रस्त्यात बंद पडतात. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. हे लक्षात घेऊन पीएमपीमधून पीसीएमटी स्वतंत्र करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.’’

‘स्थायी’च्या नवीन सदस्यांची लवकरच निवड
स्थायी समितीतील आठ सदस्यांच्या जागांसाठी नवीन सदस्यांची निवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येत्या २० फेब्रुवारीला होईल. भाजपचे चार सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, शिवसेना व अपक्ष या गटांचे प्रत्येकी एक सदस्य निवृत्त होतील. 

मोरेश्‍वर भोंडवे, राजू मिसाळ (राष्ट्रवादी काँग्रेस), सारिका लांडगे, यशोधरा बोईनवाड, विकास डोळस, अर्चना बारणे (भाजप), अमित गावडे (शिवसेना) आणि साधना मळेकर (अपक्ष) या आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड होणार असून, त्यांचा कार्यकाळ एक मार्चपासून सुरू होईल. विद्यमान आठ सदस्य आणि नवीन निवड झालेले आठ सदस्य यांच्यामधून स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत मार्चच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीच्या नवीन अध्यक्षांची निवड होईल. रिक्त    जागांसाठीची नावे संबंधित पक्षांचे गटनेते महापौरांकडे सर्वसाधारण सभेत देतील. ती नावे घोषित केली जातील, अशी माहिती उल्हास जगताप यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com