
दौंड (पुणे) : दौंड शहरातील कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यविधीसाठी फक्त २० जणांना नियमांच्या अधीन राहून उपस्थित राहण्याचा आदेश असताना सर्व नियम झुगारून या तरूणाच्या अंत्यविधीसाठी तब्बल १५० लोक जमले होते. मात्र, तरूणाच्या मृत्यूनंतर आलेल्या अहवालात तो कोरानाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अंत्ययात्रेला गेलेल्या १५० जणांचा जीव टांगणीला लागला आहे.
दौंड शहरातील गोवा गल्ली येथील कोरोनाबाधित ७० वर्षीय नागरिकाचा २५ मे रोजी मृत्यू झाला होता. या नागरिकाच्या संपर्कात आल्याने दौंड पोलिस ठाण्याशेजारील सिंधी गल्लीमधील एका ४५ वर्षीय वर्षीय तरूणाच्या घशातील स्त्रावाचा नमुना (स्वॅब टेस्ट) घेऊन उप जिल्हा रूग्णालयात तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली होती. त्यांनतर लिंगाळी (ता. दौंड) येथील एका खासगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १ जून रोजी त्याचा मृत्यू झाल्यानंतर दुपारी ४ वाजता त्याचे शव रूग्णवाहिकेत ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. पायी व दुचाकी वाहनांवरून सुमारे १५० लोक अंत्यसंस्कारासाठी भीमा नदीकाठी जमा होऊन अंत्यविधी होईपर्यंत थांबले होते. अंत्यविधीसाठी नातेवाईकांसह शहरातील व्यापारी, मित्र, शेजारी, आदी उपस्थित होते.
दरम्यान, २ जून रोजी मृत तरूणाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्यास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सिंधी गल्लीत जाऊन अंत्यदर्शन घेऊन आलेले आणि शारीरिक अंतर न पाळता अंत्यसंस्काराला उपस्थित लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २२ जणांची स्वॅब घेतले जात आहेत, अशी माहिती दौंड उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.
तरी शहाणपण नाही...
दौंड शहरातील गोवा गल्ली येथील ७० वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी पुणे येथे गेलेल्या त्यांच्या मुलाला (वय ४८) २८ मे रोजी कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर मृताचा जवळचा नातेवाईक असलेल्या ३२ वर्षीय तरूणाला २९ मे रोजी बाधा झाली आहे. अंत्यविधीसाठी उपस्थित राहिल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे सर्वश्रूत असतानाही १ जून रोजी ४५ वर्षीय तरूणाच्या अंत्यविधीला लोकांनी नाहक गर्दी करीत स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घातला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.