अकरावीसाठी १५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या नियमित फेरीत १५ हजार ८५२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या फेरीत विज्ञान आणि वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. यापुढील फेरी ही विशेष फेरी असेल. प्रवेशासाठी प्रतिबंधित केलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत पुन्हा प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येतील.

पुणे - अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या नियमित फेरीत १५ हजार ८५२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या फेरीत विज्ञान आणि वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. यापुढील फेरी ही विशेष फेरी असेल. प्रवेशासाठी प्रतिबंधित केलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत पुन्हा प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येतील.

केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने गुरुवारी तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात २, ३ आणि ५ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्‍चित करायचे आहेत. पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता तिसऱ्या फेरीचे कटऑफ आणि विशेष फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील जाहीर होईल. तिसऱ्या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावाच लागेल. मात्र, दोन ते दहा या क्रमवारीतील पसंतीचे महाविद्यालय मिळाले असेल, पण ते मान्य नसेल अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीच्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागेल.

विशेष फेरीत संधी
पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नाही, तसेच दुसऱ्या वा पुढील पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यानंतर, त्यात प्रवेश घेऊन रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून प्रतिबंधित करण्यात आले होते. अशा सर्व विद्यार्थ्यांना विशेष फेरीत प्रवेशाची पुन्हा संधी दिली जाईल. तसेच तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांनाही पुन्हा महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. विशेष फेरी ही शेवटची नियमित फेरी असेल. त्यानंतर ‘प्रथम येणारास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर फेऱ्या होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15000 Student Admission for Eleventh Education