तीन लाख प्रवाशांकडून १६ कोटींचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

पुणे-मळवली, पुणे- बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर आदी विभागांत सरत्या आर्थिक वर्षात विनातिकीट, जवळच्या अंतराचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे, अशा तीन लाख ३७ हजार प्रवाशांकडून सुमारे १६ कोटी २९ लाख रुपयांचा दंड मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने वसूल केला आहे.

पुणे - पुणे-मळवली, पुणे- बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर आदी विभागांत सरत्या आर्थिक वर्षात विनातिकीट, जवळच्या अंतराचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे, अशा तीन लाख ३७ हजार प्रवाशांकडून सुमारे १६ कोटी २९ लाख रुपयांचा दंड मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने वसूल केला आहे. 

विशेष तिकीट तपासणीदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये एक लाख ५२ हजार फुकट्या प्रवाशांचा समावेश असून, त्यांच्याकडून आठ कोटी २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत सुमारे दोन लाख ८७ हजार प्रकरणांत १६ कोटी ७६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने ही दंडवसुली केली आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून किमान २५० रुपये दंड वसूल केला जातो, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: 16 Crore Fine Recovery by Railway