पुणे विमानतळावर महिलेकडून 19 लाखांचे सोने जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

पुणे : सिंगापूरवरून तस्करी करून आणलेले सोने गोवा मार्गे पुण्यात आणणाऱ्या एका महिला प्रवाशाला लोहगाव विमानतळावर केंद्रीय सीमा शुल्क विभागाने (कस्टम) ताब्यात घेतले. तब्बल 19 लाख रुपये किमतीचे सोने महिलेने पादत्राणात लपवून आणले होते. उषा सिंग असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध भारतीय सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

गोव्याहून पुण्याला येणाऱ्या विमानातून एक प्रवासी तस्करीचे सोने आणणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने गोव्याहून विमानातून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवली होती. दरम्यान, संबंधित विमानातून उतरल्यानंतर सिंग घाईगडबडीत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्यानंतर संशयावरून तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तपासणी करताना तिच्या बुटात सोन्याचे तुकडे लपवून आणल्याचे निदर्शनास आले.

जप्त केलेल्या चार सोन्याच्या तुकड्यांचे वजन 557.64 ग्रॅम इतके असून, त्याची किंमत अंदाजे 19 लाख रुपये इतकी आहे. सोन्याच्या तुकड्यावर सिंगापूर येथील सोने उत्पादकांचा शिक्का आहे. केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे, उपायुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 lakhs of gold seized from woman at Lohagaon airport