बंटी-बबलीची जोडी, करते घरफोडी; बारामतीत १९ गुन्ह्यांचा भांडाफोड

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

भाडेतत्त्वावर घरात राहायला जाऊन मालकाचा विश्वास संपादन करुन घरफोडी करण्याची त्यांची कार्यपध्दती आहे.

बारामती : घरफोडीच्या घटनेत सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना चोरीचे तब्बल 19 गुन्हे निष्पन्न झाले. भाडेतत्वावर राहत मालकाचा विश्वास संपादन करुन घरफोडी करण्याची या पती-पत्नीची कार्यशैली असून, अजूनही काही ठिकाणच्या चोऱ्यांचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या घटनेचा तपास केल्यानंतर चक्रावून टाकणारी माहिती पुढे आली आहे. बारामती तालुक्यातील सांगवी येथे राहुल सदाशिव तावरे यांच्या घरी चोरीच्या घटनेत सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. 

Video: सलाम! पुण्यातील सफाई कामगार महिलेचा कौतुकास्पद प्रामाणिकपणा

या प्रकरणाचा तपास पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्याकडे दिला होता. घनवट यांच्या नेतृत्वाखालील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय गिरीमकर यांच्यासह पोलिस कर्मचारी अनिल काळे, रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, राजू मोमिन,विजय कांचन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, अभिजित एकशिंगे, धीरज जाधव, ज्योती बांबळे आणि दैवशिला डमरे यांच्या पथकाने तपास सुरु केला. 

एक साखरपुडा, तीन ठिकाणं आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड​

तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहिती घेतल्यानंतर नवनीत मधुकर नाईक (वय 40) आणि प्रिया नवनीत नाईक (वय 36, रा. विजय निवास, रेडीस चाळ, शिवाजीनगर, भांडूप पश्चिम मुंबई) या दोघांनीच हा गुन्हा केल्याची पोलिसांची खात्री झाली. हे दोघेही नागपूरला राहत होते. भाडेतत्त्वावर घरात राहायला जाऊन मालकाचा विश्वास संपादन करुन घरफोडी करण्याची त्यांची कार्यपध्दती आहे. 

सावधान : गजा मारणेच्या व्हिडिओला लाईक करणारेही पोलिसांच्या रडारवर​

या दोघा पती-पत्नीविरोधात राज्यासह कर्नाटकात तब्बल 19 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. भोर, लोणावळा, कोपरगाव (नगर), पोयनाड (रायगड), मोरा सागरी (नवी मुंबई), लोणंद, बडनेरा(अमरावती), पेठवडगाव (कोल्हापूर), शहापूर (ठाणे), रत्नागिरी, छावणी (नाशिक), कारंजा (वाशिम), मिरज (सांगली), सदर बझार (जालना), वाशी (नवी मुंबई), रबाळे (नवी मुंबई), के. आर. पूरम (बेंगलोर) या ठिकाणी 19 गुन्हे दाखल आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 theft cases registered against Bunty and babli couple crime revealed by Baramati Police