तारण ठेवलेल्या 40 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोर; बॅक कर्मचारी महिलेसह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

तारण ठेवलेले दागिने बॅंकेकडे दिल्यानंतर ते लॉकरमध्ये ठेवण्याची जबाबदारी बॅंक कर्मचारी महिलेकडे होती. 8 जानेवारी रोजी संबंधित महिला कर्मचाऱ्याने बॅंकेतुन दागिने चोरले. दरम्यान, लॉकरमधील दागिने चोरीला गेल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शोध घेण्यास सुरूवात केली.

पुणे : ग्राहकाने तारण ठेवलेल्या 40 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅंकेतील कर्मचाऱ्यानेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डेक्कन येथील आपटे रस्ता परिसरातील एका बॅंकेतील महिला कर्मचाऱ्यासह दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, दागिन्यांच्या मोहापायी हा प्रकार घडल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. 

याप्रकरणी एचडीएफसी बॅंकेच्या तारण विभागातील व्यवस्थापक अतुल घावरे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन बॅंकेची महिला कर्मचारी व तिच्या बहिणीच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एचडीएफसी बॅंकेच्या तारण विभागातील व्यवस्थापक आहेत. त्यांच्या बॅंकेची डेक्कन येथील आपटे रस्ता परिसरात शाखा आहे. या शाखेमध्ये महिला कर्मचारी तारण विभागामध्ये कामाला आहे. एका ग्राहकाने त्याच्याकडील सोने संबंधीत बॅंकेकडे तारण ठेवून कर्ज घेतले होते. त्याने बॅंकेकडे 40 लाख 63 हजार रुपये इतक्‍या किंमतीचे सोन्याचे दागिने तारण ठेवले होते. 

आणखी वाचा - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास संकुचित ठेवणार का? 
 

तारण ठेवलेले दागिने बॅंकेकडे दिल्यानंतर ते लॉकरमध्ये ठेवण्याची जबाबदारी बॅंक कर्मचारी महिलेकडे होती. 8 जानेवारी रोजी संबंधित महिला कर्मचाऱ्याने बॅंकेतुन दागिने चोरले. दरम्यान, लॉकरमधील दागिने चोरीला गेल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी संबंधीत महिला कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने दागिने चोरी केल्याची कबुली दिली. दागिने चोरल्यानंतर ते दागिने तिने तिच्या बहिणीच्या पतीकडे ठेवण्यास देऊन त्यास दागिने मोडण्यास सांगितले. त्यापैकी काही दागिने मोडून पैसेही मिळाले. त्यानुसार, पोलिसांनी दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. त्यानंतर पोलिसांनी महिला कर्मचारी व तिच्या बहिणीच्या पतीला अटक केली. दोघांना 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लंबे करीत आहेत. 

आणखी वाचा - शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा उघडला

दागिन्यांचा मोह नडला ! 
ग्राहकाने दागिने तारण ठेवण्यासाठी दिले. त्यावेळी संबंधीत महिला कर्मचारी त्या दागिन्यांच्या मोहात पडली. संबंधीत महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यानंतर तिने दागिने चोरून ते बहिणीच्या पतीकडे मोडण्यासाठी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 arrested along with a female bank employee for Theft of gold jewelry worth Rs 40 lakh