esakal | पुणे जिल्ह्याला २० कोटींचा निधी !
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्याला २० कोटींचा निधी !

पुणे जिल्ह्याला २० कोटींचा निधी !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''राज्य सरकारकडून सामाजिक अर्थसहाय योजनांतर्गत ८७ हजार ३८१ लाभार्थ्यांसाठी २० कोटी २३ लाख ४२ हजार रुपयांचे अर्थसहाय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. यामुळे कोरोनाच्या कालावधीत दुर्बल घटकांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.''

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आर्थिक व दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन यांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना एप्रिल आणि मे २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीचे अर्थसहाय एकत्रित वितरित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी प्राप्त झालेली २० कोटी २३ लाख ४२ हजार रुपये अनुदानाची रक्कम सर्व तालुक्यांना वितरित केली आहे. त्यामध्ये पुणे शहर तसेच हवेली, आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, इंदापूर, जुन्नर, मावळ, मुळशी, पुरंदर, खेड, शिरूर आणि वेल्हा या तालुक्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: पुणे : 24 तासात 11 हजार 661 नवे रुग्ण; 159 जणांचा मृत्यू

या सर्व योजनांतील समाविष्ट असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील आणि २१ हजार रुपयांच्या आत उत्पन्न असणारे दिव्यांग, निराधार, परितक्त्या, विधवा, घटस्फोटित, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी या सर्व दुर्बल घटकांतील नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळणार आहे. ही रक्कम तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

''तहसील कार्यालयांमार्फत लाभार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. लाभार्थ्यांनी बँकामध्ये सुरक्षित अंतर ठेऊन योजनेचा लाभ घ्यावा.''

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

८७ हजार ३८१ - पुणे जिल्ह्यातील लाभार्थी

२० कोटी २३ लाख ४२ हजार रुपये- मिळालेला निधी

हेही वाचा: रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या दोघांना अटक

loading image