हेल्मेट विक्रीत वीस टक्के वाढ

पिंपरी - हेल्मेट खरेदीसाठी झालेली गर्दी.
पिंपरी - हेल्मेट खरेदीसाठी झालेली गर्दी.

पिंपरी - शहरात हेल्मेटसक्ती लागू नाही. मात्र पुण्यातील हेल्मेटसक्तीचा परिणाम म्हणून शहरातील हेल्मेट विक्रीमध्ये सुमारे वीस टक्‍के वाढ झाली आहे. दुसरीकडे काही विक्रेत्यांकडून रस्त्यावर अप्रमाणित हेल्मेटची सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसून आले.

पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील दुचाकी वाहनचालकांमध्ये हेल्मेटच्या वापराविषयी काहीशी जागरूकता निर्माण झाली आहे. पुण्यात हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई झाली. पिंपरी-चिंचवडमधील अनेक जण नोकरी व्यवसायानिमित्त पुण्यात ये-जा करतात. दंडाचा आर्थिक फटका बसू नये, म्हणून अनेक जणांनी हेल्मेट खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

शहरातील जुन्या दुकानदारांकडून मध्यम आणि चांगल्या दर्जाची हेल्मेट उपलब्ध आहेत. मध्यम दर्जाच्या हेल्मेटची किंमत ३५० ते ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. नामांकित कंपन्यांच्या हेल्मेटच्या किमती ८०० ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. 

शहरात रस्त्यांच्या कडेलाही काही विक्रेते हेल्मेटची विक्री करीत आहेत. या हेल्मेटच्या खोक्‍यावर ७०० ते ९०० रुपये अशी किंमत लिहिलेली असते. मात्र हे विक्रेते कोणतेही हेल्मेट घेतले तरी त्याची किंमत ६०० रुपये असल्याचे सांगतात. थोडी घासाघीस केल्यास ५०० रुपयांना देण्यास तयार होतात. 

हेल्मेटचा दर्जा कसा ओळखाल?
हेल्मेटच्या मागे अनेकदा आयएस ४१५१ असा क्रमांक लिहिलेला असतो. हेल्मेट या वस्तूंसाठी असलेला हा क्रमांक असतो. हेल्मेट आयएसआय प्रमाणित असल्याच्या लोगोवर हा क्रमांक असतो. तसेच लोगोखाली आयएसआय प्रमाणित असल्याचा सात आकडी क्रमांक असतो. प्रत्येक कंपनीसाठी हा क्रमांक स्वतंत्र असतो. हेल्मेट खरेदी करण्यापूर्वी संबंधित हेल्मेट उत्पादक कंपनीविषयी अगर त्या उत्पादनाविषयी काही शंका असल्यास वाहनचालकांनी भारतीय मानक संस्थेच्या (ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड) www.bis.gov.in  या संकेतस्थळास भेट दिल्यास त्यांना अधिक माहिती मिळू शकते.

आम्ही गेल्या सुमारे तीस वर्षांपासून हेल्मेट विक्री करतो. रस्त्यावर मिळणाऱ्या हेल्मेटच्या दर्जाबाबत सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत विक्रेत्यांकडून हेल्मेट खरेदी करावे.
- गजानन अगरवाल, हेल्मेट विक्रेते, पिंपरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com