esakal | राज्यात २० हजारांची पदभरती करणार
sakal

बोलून बातमी शोधा

pune

राज्यात २० हजारांची पदभरती करणार : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारच्या वतीने १५ हजार जागांच्या भरतीचे आश्वासन देण्यात आले होते. आता त्याही पुढे जात सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी २० हजार पदांपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार भरती करणार असल्याचे आश्वासन सोमवारी दिले. मात्र, आजपर्यंत फक्त पाच हजार ७३९ जागांसाठीचे मागणीपत्र विभागाला मिळाल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

नवी पेठेतील पत्रकार संघाच्या सभागृहात सकाळ आणि सामच्या वतीने एमपीएससी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील पहिल्या सत्रातील चर्चेत त्यांनी ही माहिती दिली. व्यासपीठावर यावेळी माजी प्रधान सचिव, महेश झगडे, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस आणि विद्यार्थी प्रतिनिधी नीलेश गायकवाड उपस्थित होते. सामचे संपादक प्रसन्न जोशी यांनी या चर्चेचे संचालन केले. भरणे म्हणाले, ‘‘विविध विभागांकडून रिक्त जागांचे मागणीपत्र तातडीने मागविण्यात आले असून, लवकरच सर्वांचा आकृतिबंध पडताळून एक हजार ९९७ पदांची भरती करण्यात येईल. न्यायालयाचे निकाल, लॉकडाउन आधी कारणांमुळे नोकरभरतीला उशीर होत आहे. त्याबद्दल आम्हाला जाणीव असून, ग्रामीण भागातून येणाऱ्या तसेच सर्व घटकातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.’’

हेही वाचा: कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’

प्रत्येक विभागाच्या सचिवाला रिक्त पदांबद्दल माहितीच असायला हवी, असे मत झगडे यांनी मांडले. ते म्हणाले, ‘‘लोकांच्या सेवेसाठीच कराचे संकलन होते. त्यामुळे नोकरशाहीत रिक्त पदे राहणे उचित नाही. आर्थिक अधिवेशनातच दरवर्षी रिक्त पदांची माहिती द्यायला हवी. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनच सर्व पदभरती करणे शक्य आहे. पूर्व परीक्षेनंतर दोनच महिन्यात विद्यार्थ्याच्या हातात नियुक्तीपत्र देणे शक्य आहे. त्यासाठी आयोगाला अधिक सक्षम करायला हवे.’’ तर नोकऱ्या निर्माण करणे ही सरकारचीच जबाबदारी असल्याचे फडणीस यांनी यावेळी स्पष्ट केले. सरळसेवा भरतीत वादग्रस्त कंपन्यांना कंत्राट का मिळाले, रिक्तपदांची भरती केव्हा करणार, असा प्रश्न गायकवाड यांनी विचारला.

हेही वाचा: CBSE दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

राज्यमंत्री भरणे म्हणाले...

- यूपीएसीच्या धरतीवरच एमपीएससीचे एक वर्ष आधी वेळापत्रक

- सरळसेवा भरती एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यासाठी प्रयत्न करणार

- कोणत्याही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले की कोणीतरी न्यायालयात जाते. त्यामुळे परीक्षेला स्थगिती मिळते. परंतु यापुढे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले की त्याला स्थगिती मिळू नये यासाठी कायदे करणार

- एमपीएससीची सदस्य संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील

स्वप्नीलसारखं या पोरांचं होऊ देऊ नका...

स्वप्नीलचा बळी निश्चितीच एमपीएससीच्या प्रक्रियेमुळे झाला आहे. माझी एमपीएससी आणि सरकारला विनंती आहे. माझ्या स्वप्नीलचं जे झालं ते या पोरांचं होऊ देऊ नका. साहेब काहीतरी करा, माझी पोरांनाही विनंती आहे. माझ्या स्वप्निलने जे केलं ते तुम्ही करू नका, अशी आर्त विनंती स्वप्नील लोणकरचे वडील सुनील लोणकर यांनी केली. स्वप्नीलच्या वडीलांच्या हुंदक्याने सभागृह अंतर्मुख झाले होते.

loading image
go to top