भाभा अणुशक्ती केंद्रात २२४ जागांची भरती प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

भवानीनगर - केंद्र सरकारच्या मुंबई येथील भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमध्ये अभियांत्रिकी पदविका घेतलेल्यांसाठी ८६, तर आयटीआय उत्तीर्ण असलेल्यांसाठी १३८ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी २० ऑगस्ट ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. दोन वर्षे प्रशिक्षण व त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट आणि टेक्‍निशियन या पदांवर त्यांना सामावून घेतले जाणार आहे.

या भरती प्रक्रियेत मॅकेनिकल, इलेक्‍ट्रिकल, मेटालार्जी, केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्स्ट्रूमेंटेशन या पदांसाठी त्यामधील किमान पदविका आणि केमिस्ट्री व फिजिक्‍स या दोन पदांसाठी बीएस्सी पदवी ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता आहे. या पदाच्या भरतीसाठी खुल्या गटातील उमेदवाराचे वय २० ऑगस्ट २०१८ रोजी किमान १९ व कमाल २४ वर्षे असावे. प्लॅंट ऑपरेटर, लॅबोरेटरी, एसी मॅकेनिक, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्स्ट्रूमेंटेशन व मॅकेनिकल या पदांच्या १३८ जागांसाठी आयटीआय उत्तीर्ण; तसेच प्लॅंट ऑपरेटर, लॅबोरेटरी या पदांसाठी मात्र बारावी विज्ञान शाखेतील विषयांमध्ये किमान ६० टक्‍क्‍यांनी उत्तीर्ण असावे अशी अट आहे. या भरतीसाठी खुल्या गटातील उमेदवाराचे वय २० ऑगस्ट २०१८ रोजी किमान १८ व कमाल २२ वर्षे असावे. वरील दोन्ही श्रेणीसाठी शासन नियमानुसार राखीव प्रवर्गांसाठी वयात सवलत राहील. या दोन्ही पदांसाठी उमेदवाराची उंची किमान १६० सेमी व वजन किमान ४५.५ किलो असावे. या दोन्ही पदांसाठी पहिल्या दोन वर्षांत प्रशिक्षण असेल, त्यासाठी विद्यावेतन दिले जाणार आहे. 

या भरतीसाठी पूर्व परीक्षा, ॲडव्हान्स चाचणी व कौशल्य चाचणी असे तीन टप्पे असतील. याकरिता खुल्या प्रवर्गासाठी व ओबीसी प्रवर्गासाठी १५० रुपये, तर अनुसूचित जाती, जमाती व महिला प्रवर्गासाठी १०० रुपये शुल्क राहील. यासाठी अर्ज करण्याकरिता व अधिक माहितीसाठी www.recruit.barc.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Web Title: 224 Seats Recruitment Process in Bhabha Nuclear Power Center