मुळशीत २२८१ सभासद प्रतीक्षेत

बंडू दातीर
गुरुवार, 21 जून 2018

पौड - मुळशी तालुक्‍यातील ३१३२ सभासदांना सरकारने दिलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ झाला असून, २२८१ कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत तालुक्‍यात पावणेआठ कोटी रुपयांची थकबाकी मंजूर केली असून, २६३५ शेतकऱ्यांचा सव्वासहा कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा उतरला आहे.

पौड - मुळशी तालुक्‍यातील ३१३२ सभासदांना सरकारने दिलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ झाला असून, २२८१ कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत तालुक्‍यात पावणेआठ कोटी रुपयांची थकबाकी मंजूर केली असून, २६३५ शेतकऱ्यांचा सव्वासहा कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा उतरला आहे.

मुळशी तालुक्‍यात २७२६ शेतकरी आणि ४६ विकास सोसायट्या आहेत. सोसायटीमार्फत शेतकरी दरवर्षी कर्ज घेत असतात. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करीत ३० जून २०१६ पूर्वी कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली. जिल्हा बॅंकेने तालुक्‍यातील शेतकऱ्यांची माहिती विहित नमुन्यात पाठवली. शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे खरीप, रब्बी आणि मध्यम मुदतीचे कर्ज अशी तीन स्वतंत्र खाती तयार केली. त्यानुसार तालुक्‍यातील शेतकऱ्यांची एकूण ५४१३ खाते तयार झाली. त्यात दीड लाखापेक्षा कमी कर्जदार शेतकरी, दीड लाखापेक्षा जास्त कर्जदार आणि नियमित कर्ज भरणारे, असे कर्जमाफीचे तीन गट तयार केले.

कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. आधार कार्ड, पॅन कार्ड नसल्याने काहींना अर्ज भरता आले नाही. कर्जाचे हप्ते वेळेत भरणाऱ्यांनीही पुन्हा कर्जमाफी मिळेल, या आशेने अर्ज भरले. सन २०१७ मध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनीही अर्ज केला. ५४१३ पैकी ३१३२ सभासदांची ७ कोटी ७५ लाख ४२ हजार ९३२ रुपयांची कर्जथकबाकी मंजूर झाली. नियमित कर्जफेड करणाऱ्या १५८३ सभासदांना दोन कोटी ४७ लाख ४८ हजार ६८२ रुपये प्रोत्साहनपर साह्य केले. दीड लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या ९८२ सभासदांची तीन कोटी २२ लाख १८ हजार १८९ रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या २०० सभासदांना ए-क कोटी ४७ लाख २४ हजार ६९४ रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली. त्यापैकी ६३ सभासदांनी आपल्या कर्जातील दीड लाख वगळून जादा असलेली रक्कम बॅंकेत जमा केली. त्यामुळे त्यांचे उर्वरित दीड लाख माफ करण्यात आले. १३७ शेतकऱ्यांनी दीड लाखाच्या पुढील फरकाची रक्कम न भरल्याने त्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अद्याप २२८१ सभासद कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. (उद्याच्या अंकात - आंबेगाव)

सोसायट्यांच्या वसुलीवर परिणाम
कर्जमाफीमुळे सोसायट्यांच्या वसुलीवर या वर्षी विपरीत परिणाम झाला. कर्जाची वसुली न झाल्याने वाटप अपेक्षित होऊ शकले नाही. गतवर्षी ४६ सोसायट्यांमधील २३७५ शेतकऱ्यांना १४ कोटी ६७ लाख ७६ हजार रुपयांचे खरीप कर्ज वाटले होते. या वर्षी मात्र त्यात घट होऊन अवघे ८ कोटी ६० लाख ६६ हजार रुपयांचे कर्ज वाटले गेले. त्यामुळे बॅंकेचा तालुक्‍यातील नफाही निम्म्याने कमी झाला. सोसायटीतून कर्जदार शेतकऱ्यांची संख्याही घटली.

Web Title: 2281 member waiting for debt waiver