esakal | पुणे महापालिकेकडून १९ दिवसांत २५ लाखाचा दंड वसूल
sakal

बोलून बातमी शोधा

25 lakh fine collected from Pune Municipal Corporation in 19 days

पुणे महापालिकेकडून १९ दिवसांत २५ लाखाचा दंड वसूल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यावा म्हणून कडक निर्बंध लावण्यात आले, मात्र, तरीही नागरिकांचे बेशिस्त वर्तन कमी झालेले नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणे, मास्क न वापरणे अशा कारणांमुळे महापालिकेने १९ दिवसांत २५ लाख ७६ हजार ८७० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कडक निर्बंधांमुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली असली तरी किराणा दुकाने, भाजी, फळ विक्री दुकानांत शिस्तीचे पालन केले जात नाही. तसेच सोसायट्यांचे परिसर, वस्ती भाग येथे नागरिक मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणे, अस्वच्छता करणे असे बेशिस्त वर्तन सुरूच आहे. यामध्ये प्रामुख्याने तरुण वर्गाचा समावेश आहे. अशांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत कारवाई केली जात असून, मास्क न घातल्यास ५०० रुपये तर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याने १ हजार रुपयांचा दंड केला जात आहे. पालिकेने निर्बंध आणल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत २२ एप्रिल पर्यंत १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत २५ लाख ७६ हजार ८७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कडक निर्बंध आणलेले असताना रोज एक लाखापेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आलेला आहे.

हेही वाचा: पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ११ एप्रिलपासून ओहोटी सुरू

''कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती नियमांचे पालन करत आहेत; पण आपल्याच घराच्या परिसरात सोसायटी, वस्तीमध्ये वावरताना नियमांचे पालन केले जात नाही. यामध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. काही वेळा कारवाई करूनही अशा वेळी परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही. त्यासाठी प्रबोधनावरही भर द्यावा लागतो.''

- जयदीप पवार, सहाय्यक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय

''कोरोनाची साथ आटोक्यात यावी, यासाठी महापालिकेचे सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत; पण काही नागरिक नियमांचे पालक करत नसल्याने स्वतःसह इतरांना धोका निर्माण करत आहेत. अशांवर कारवाईसाठी मोहीम सुरू आहे. नागरिकांना नियमांचे पालन करून कारवाई टाळावी.''

- माधव जगताप, उपायुक्त, पुणे महापालिका'

हेही वाचा: थोडा रुसवा, थोडा फुगवा संसाराचा भन्नाट गोडवा!

एप्रिल महिन्यात तारखेनिहाय वसूल दंड

तारीख दंडाची रक्कम

४ - १,११,७९०

५ - १,८१,०८०

६ - १,६०,९००

७ - १,२६,१६०

८ - १,३९,१८०

९ - ३,११,०८०

१० - १,११,३००

११ - ६९,३००

१२ - २,११,९४०

१३ - १,५१,४६०

१४ - ९८,१२०

१५ - १,३१,०५०

१६ - ९१,४३०

१७ - ५५,६८०

१८ - ४६,१००

१९ - १,७६,४४०

२० - १,४९,४३०

२१ - ११३५२०

२२ - १,४१०००

loading image