अडीचशे टपरीधारकांना लोणावळ्यामध्ये जागा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

लोणावळा - लोणावळा नगर परिषदेच्या वतीने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, गुरुवारी टपरीधारकांसाठी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अडीचशे टपरीधारकांना जागा देण्यात आल्या आहेत. शहर फेरीवाला समितीचे अध्यक्ष व मुख्याधिकारी सचिन पवार, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. या वेळी समितीचे सल्लागार दत्तात्रेय गवळी, फौजदार आय. जे. काझी, सूर्यकांत वाघमारे, नगरसेवक राजू बच्चे, सुधीर शिर्के, रचना सिनकर, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब फाटक, संजय आडसुळे आदी उपस्थित होते. नगर परिषदेच्या वतीने शहरात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने 2009 मधील फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करत गुरुवारी (ता. 12) लाभार्थ्यांना टपरीसाठी जागावाटप करण्यात आले. धोरणानुसार स्थिर, फिरता असे वर्गीकरण करण्यात आले. शहरातील सुमारे सव्वातीनशे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार भांगरवाडी प्रभागात बारा, नांगरगावमध्ये सहा, वळवणमध्ये बारा, रायवूड "डी' वॉर्ड येथे अडतीस, गवळीवाडा येथे बावीस, गावठाण "ई' वॉर्ड येथे आठ, "जी' वॉर्ड, तुंगार्ली येथे 33, खंडाळा येथे 36 जागांसाठी सोडत काढण्यात आली. याचबरोबर "एफ' वॉर्ड बाजारपेठ, "बी' वॉर्ड गवळीवाडा येथे जागानिश्‍चिती न झाल्याने त्याठिकाणची सोडत काढली नाही.

हस्तांतर, भाड्याने दिल्यास कारवाई - पवार
फेरीवाला धोरण 2009 च्या निकषांनुसार जो मूळचा टपरी, पथारी व्यवसाय करतो, त्यास फेरीवाला धोरणाचा लाभ मिळावा, असे धोरण आहे. मात्र, लाभार्थ्याने टपरी भाड्याने दिल्यास अथवा हस्तांतर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी सचिन पवार म्हणाले. घनकचरा व्यवस्थापनानुसार ओला व सुका कचरा वेगळा करत परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

लोणावळा - शहर फेरीवाला धोरणानुसार टपरीधारकांसाठी सोडत काढताना मुख्याधिकारी सचिन पवार. या वेळी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आदी.

Web Title: 250 shops in Lonavla place holders