पंचवीस हजार इंजेक्‍शनच्या डोसची खरेदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

विषाणूंच्या प्रतिबंधासाठी  निर्णय
पुणे - हिवाळ्यात डोके वर काढणाऱ्या स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने २५ हजार इंजेक्‍शनच्या डोसची खरेदी केली आहे. या वर्षी राज्यात आतापर्यंत दोन रुग्णांना स्वाइन फ्लू झाला असून, एका रुग्णाचा पुण्यात मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

विषाणूंच्या प्रतिबंधासाठी  निर्णय
पुणे - हिवाळ्यात डोके वर काढणाऱ्या स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने २५ हजार इंजेक्‍शनच्या डोसची खरेदी केली आहे. या वर्षी राज्यात आतापर्यंत दोन रुग्णांना स्वाइन फ्लू झाला असून, एका रुग्णाचा पुण्यात मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

‘एच१एन१’ विषाणूंमुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग होतो. हिवाळ्यामध्ये तापमानाचा पारा कमी झाल्याने या विषाणूंच्या संसर्गास पोषक वातावरण तयार होते. गेल्या आठ वर्षांपासून प्रत्येक हिवाळा आणि पावसाळ्यात स्वाइन फ्लूच्या उद्रेकाचा धोका राज्यात असतो. या विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने अतिजोखमीच्या रुग्णांना प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासून स्वाइन फ्लूचा उद्रेक नियंत्रणात आल्याचा विश्‍वास आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पुणे परिमंडळासाठी साडेसात हजार लस
प्रतिबंधात्मक लसीमुळे गेल्या वर्षी स्वाइन फ्लूच्या फैलाव नियंत्रणात आल्याने यंदाही राज्याच्या आरोग्य खात्याने ही लस खरेदी केली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात २५ हजार प्रतिबंधात्मक लसीची खरेदी केली आहे. ही लस ऐच्छिक आणि मोफत आहे. त्यापैकी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी साडेसात हजार लस देण्यात आल्या आहेत. स्वाइन फ्लू झालेल्या प्रत्येक रुग्णांची नोंद राज्याच्या आरोग्य खात्याकडे केली जाते. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात स्वाइन फ्लू
वर्ष .......... रुग्ण ............. मृत्यू

२०१५ ...... ८५८३ ....... ९०५
२०१६ ...... ८२ ............ २६
२०१७ ....... २ ............. १
(१७ जानेवारीपर्यंत)

हिवाळ्यात होणाऱ्या स्वाइन फ्लूचा फैलाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य खात्याने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. त्या अंतर्गत अतिजोखमीच्या रुग्णांना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत असून, त्यामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण निश्‍चित कमी होते, असा गेल्या वर्षीचा अनुभव आहे. 
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य खाते 
 

राज्यातील सद्यःस्थिती 
राज्यात स्वाइन फ्लूवर लक्ष ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा आरोग्य खात्याने उभारली आहे. स्वाइन फ्लू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून निश्‍चित निदान झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाची नोंद आरोग्य खात्याकडे केली जाते. सध्या राज्यात दोन जणांना स्वाइन फ्लू झाला असून, त्यापैकी एका रुग्णाचा पुण्यात रविवारी (ता. ८) मृत्यू झाला. दुसऱ्या एका रुग्णाला कृत्रिम श्‍वासोच्छवासावर ठेवण्यात आले असून, पुण्यातील खासगी रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू आहेत. 

अतिजोखमीच्या रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक लस
उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, गर्भवती यांना स्वाइन फ्लूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. अशा रुग्णांमध्ये उपचाराची गुंतागुंत वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये आधीच्या कोणत्या तरी आजाराची गुंतागुंत वाढल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. त्यामुळे असे आजार असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस देण्याची योजना गेल्या वर्षापासून राज्याच्या आरोग्य खात्याने सुरू केली. त्याअंतर्गत गेल्या वर्षी एक लाख एक हजार ३५६ रुग्णांना ही लस देण्यात आली. त्यात आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 

लक्षणे
ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा

हे करा
वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवा
पौष्टिक आहार घ्या
भरपूर पाणी प्या
पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या

हे टाळा
हस्तांदोलन
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये
फ्लूसदृश लक्षणे असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये

Web Title: 25000 injection purchasing