व्यापारी महासंघाच्या शिबिरात आढळले कोरोनाबाधित कर्मचारी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

व्यापारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यास महासंघाने मदत करावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते.

पुणे : पुणे महानगरपालिका आणि पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या कोरोना चाचणी शिबिरामध्ये ८४० कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २६ कर्मचारी हे कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण कर्मचारी संख्येमध्ये बाधितांची संख्या ही तीन टक्के एवढी आहे. 

पुण्यात शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊनबाबत प्रशासनाने दिले स्पष्टीकरण; वाचा सविस्तर​

पुणे महापालिका आणि व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मध्यंतरी एकत्रित बैठक झाली होती. त्यावेळी व्यापारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यास महासंघाने मदत करावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात लक्ष्मी रोड येथील दुकानातील ८४० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, राहण्याचा पत्ता आणि आधार कार्डची झेरॉक्‍स घेण्यात आली. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 'जम्बो हॉस्पिटल' लवकरच रुग्णांच्या सेवेत; प्रशासनाने दिले संकेत​

तपासणीमध्ये २६ कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. परंतु या सर्वांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना होम क्वॉरंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे. हे शिबिर पुढील सातही दिवस चालू राहणार असून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी न घाबरता चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केले आहे, तर येणाऱ्या काळात विभागवार आणि वेगवेगळ्या असोसिएशनच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांची तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, असे सचिव महेंद्र पितळिया यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 employees found corona positive in corona test camp organized by PMC and Pune Chamber of Commerce