२.६२ कोटींच्या जलतरण तलावास वापराआधीच गळती

pune
pune

दौंड (पुणे) : दौंड नगरपालिकेने २ कोटी ६२ लाख रूपये खर्च करून बांधलेल्या जलतरण तलावास वापरापूर्वीच गळती लागली आहे. शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असताना वादग्रस्त जागेत बांधण्यात आलेला तलाव गेल्या नऊ महिन्यांपासून गळतीमुळे विना वापर पडून आहे. गळतीमुळे शहरातील विकासकामांविषयी प्रशासन व पदाधिकार्यांची अक्षम्य निष्काळजी आणि ठराविकांची टक्केवारी प्रकर्षाने पुढे आली आहे.     

दौंड शहरातील महावितरण उप - केंद्राच्या पाठीमागे १२ जून २०१६ रोजी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते जलतरण तलावाचे भूमीपूजन करण्यात आले होते. तीस गुंठे क्षेत्रातील तलावासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एकूण २ कोटी ६२ लाख ४२ हजार ४६१ रूपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्य जलतरण तलाव ८२ फूट लांब, ३९ फूट रूंद व ८.२ फूट खोल आहे तर मुलांसाठी स्वतंत्रपणे बांधण्यात आलेला तलाव २९ फूट लांब, १९ फूट रूंद व ३ फूट खोल आहे. ठेकेदाराने १२ मे २०१८ रोजी काम पूर्ण झाल्याचा दावा करीत सदर तलाव नगरपालिकेच्या ताब्यात दिला. या बाबत १५ मे २०१८ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत सदस्य गौतम साळवे यांनी जलतरण तलावाच्या मंजुरीसाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याप्रकरणी लेखी तक्रार करून मुख्याधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. परंतु चौकशी करण्यात आली नाही.

दरम्यान नऊ महिन्यांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेले असतानाही तलावाचे लोकार्पण का केले जात नाही ?, याचा मागोवा घेण्यासाठी गौतम साळवे यांनी या तलावाची पाहणी केली असता तलावास गळती लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या प्रकरणी आज (ता. २८) तलावाचा रेखांकन नकाशा, मंजूरी प्रक्रिया, झालेले बांधकाम आणि गळती प्रकरणी सखोल चौकशी करण्याची लेखी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.  

दौंड शहरात सप्टेंबर २०१५ पासून दिवसाआड एक वेळ पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई कायम असताना जलतरण तलावाचा घाट घालण्यात आला. परंतु तो देखील निकृष्ट पध्दतीने बांधण्यात आल्याने नागरिकांच्या कररूपी पैशांचा अपव्यय झाला आहे. 

मोठी गळती असल्यास कारवाई
मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांना या बाबत विचारले असता ते म्हणाले, चाचणीच्या वेळी गळती नव्हती परंतु, पाहणी करून निर्णय घेऊ. किरकोळ गळती असेल तर दुरूस्ती करून घेण्यात येईल व मोठी गळती असल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल. रेखांकन नकाशा संबंधी नगररचना संचालक यांच्याकडे अपिल करणे अपेक्षित आहे. सदर तलावाचे व्यवस्थापन नगरपालिकेकडून होणे शक्य नसल्याने तलाव चालविण्यासाठी निविदा प्रकाशित करण्यात आलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com