दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेबाबत प्रश्नचिन्ह कायम; विद्यार्थ्यांचे भवितव्य लागले टांगणीला!

मीनाक्षी गुरव
Saturday, 19 September 2020

गेल्या काही दिवसांपासून ओम फेरपरीक्षा कधी होणार याबाबत चौकशी करण्यासाठी सातत्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालय फोन करत आहे.

पुणे : दहावीच्या परीक्षेत अवघ्या काही गुणांनी अनुत्तीर्ण झालेला ओम (नाव बदललेले आहे) गेल्या काही दिवसांपासून  फेरपरीक्षा कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहे. ही परीक्षा झाल्यास त्यासाठी पुन्हा जोमाने अभ्यास करता येईल आणि पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल, अशी त्याची अपेक्षा आहे. खरंतर दहावी-बारावीचा निकाल लागून दीड महिना उलटला, तरी अद्याप फेरपरीक्षेबाबत प्रश्नचिन्ह असल्याने ओमसारख्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

पुणेकरांनो, तुम्ही वाचलेली पुस्तके, ग्रंथ दान करा; युवकांनी केलंय आवाहन​

गेल्या काही दिवसांपासून ओम फेरपरीक्षा कधी होणार याबाबत चौकशी करण्यासाठी सातत्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालय फोन करत आहे. परंतु त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचे त्याने 'सकाळ'शी बोलताना सांगतिले. राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार तसेच फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या परीक्षा होतील, याबाबतही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती समोर येत आहे.

पुणेकरांची काळजी वाढवणारी बातमी; पुढील १२ दिवसांत वाढणार ७९ हजार कोरोना रुग्ण!​

दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्यात, तर दहावीचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात येतो. त्यानंतर तत्काळ जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते. परंतु यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या परीक्षांचे निकाल उशिरा जाहीर झाले. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी,' राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता या परीक्षा आता दिवाळीनंतरच होतील, असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या पुनर्परीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे चित्र गायकवाड यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. परंतु या फेरपरिक्षांबाबत आतापर्यंत तरी अनिश्चितता असल्यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढत असल्याचे दिसून येते.

"दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या परीक्षांचे नियोजन सुरू आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल."
- डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

मावळते पोलिस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी पोलिसांबद्दल भावना केल्या व्यक्त, म्हणाले...​

दहावी-बारावीच्या (२०१९-२०) परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या :

 

इयत्ता परीक्षेला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी
राज्यातील एकूण विद्यार्थी
- दहावी (नियमित विद्यार्थी)
१५,७५,१०३ १५,०१,१०५ ७३,९९८
दहावी (पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी) १,७९,२६४ १,३५,९९१ ४३,२७३

पुणे विभागातील विद्यार्थी

- दहावी (नियमित विद्यार्थी)

२,५७,००८ २,५०,१६८ ६,८४०

 

इयत्ता परीक्षेला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी
बारावी (नियमित विद्यार्थी) १४, १३,६८७ १२,८१,७१२ १,३१,९७५
बारावी (पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी) ८३,३४१ ३३,७०३ ४९,६३८

(पुणे विभागातील विद्यार्थी)

- बारावी (नियमित विद्यार्थी)

२,४०,६९७ २,२२,६४६ १८,०५१

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no decision has been taken yet regarding re-examination of SSC and HSC of State Board