अन्यथा पिंपरी-चिंचवड रोडपती होईल- फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

पॉवरफुल दादांनी काम केलं नाही
आधीच्या सरकारमध्ये अजितदादा किती पॉवरफुल होते हे आपल्याला माहीत आहे. मात्र, त्यांनी येथील लोकांसाठी अपेक्षित काम केले नाही. त्यांच्या शब्दावर सरकार हालत होतं. 

पिंपरी- मी पूर्वी येथे आलो तेव्हा खूप काम झालेलं दिसलं. मात्र, नंतर ही काम खूप कमी होत गेली. पिंपरी चिंचवड करोडपती होते ते आता लखपती झालं आहे. आता येथे परिवर्तन झालं नाही तर रोडपती व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फोडण्यात आला. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. 
पिंपरी-चिंचवडमधील जनता भाजपला एकहाती सत्ता देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

ही निवडणूक म्हणजे कलगीतुऱ्यांची नाही, भाषणांची नाही. शहरासमोरील प्रश्न काय आहेत याचा ऊहापोह या निवडणुकांच्या निमित्ताने झाला पाहिजे. 
आम्ही 70 विकास आराखड्यांना मंजुरी दिली. पुण्याचा विकास आराखडा राष्ट्रवादीने रखडून ठेवला होता. अजित पवार एवढी वर्षे सत्तेत असूनही पुण्याचा विकास आराखडा करू शकले नाहीत. तो आम्ही एक वर्षात करून दाखवला. ज्याची जमीन विकास आराखड्याच्या आरक्षणामध्ये जाणार आहे अशा लोकांना खर्च येणार अशी टीडीआरची तरतूद आम्ही केली. 

अनधिकृत बांधकामे, झोपडपट्ट्यांचे प्रश्न येथे महत्त्वाचे आहेत. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक बेघराला घर आम्ही देऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. 

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, "दादा, बाबांच्या वादात पीएमआरडीएची स्थापना लांबणीवर पडली. मात्र, भाजप सरकार आल्यावर ही स्थापना झाली. त्यांनी 12 वर्षे फक्त मेट्रोची चर्चा केली. आम्ही कार्यवाही सुरू केली असून, त्यासाठी 950 कोटींचा निधीही मंजूर केला आहे.
राष्ट्रवादी केवळ पश्चिम महाराष्ट्रात आहे. येथेही त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले नाहीत. आता मतदार पवारांना बारामतीच्या बंगल्यात नेऊन बसवतील." 

खासदार अमर साबळे म्हणाले, "पिंपरी-चिंचवडचा जो विकास झाला तो केवळ अजित पवारांनी केलाय असं सांगितलं जात आहे. मात्र, तसे नसून, या शहराचा विकास दहा टक्केच झाला. तोही येथील भूमिपुत्रांमुळे झाला आहे." 

"आम्ही सहकाऱ्यांनी दिलेल्या योगदानातून पिंपरी चिंचवडचा विकास झालाय. एवढा विकास मागच्या पिढीत व्हायला हवा होता. या वेगाने विकास झाल्यास पुढील पिढीलाही अपेक्षित विकास पाहायला मिळणार नाही," अशी टीका आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली.