रसद पुरविणाऱ्यांचे धागेदोरे सापडले

3 Finance providers arrested by ATS
3 Finance providers arrested by ATS

पुणे- राज्यात घातपात करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. मात्र, त्यांच्या "मास्टर माइंड'चा तपास अद्याप लागलेला नाही. त्यांना वित्तपुरवठा करणारे आणि आश्रय देणाऱ्यांबाबत काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याआधारे राज्यातील प्रमुख शहरांत तपास वेगाने सुरू झाला आहे. 

अटक केलेले तिघेही एका मोठ्या कटातील प्यादे असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात बॉम्ब बनविणे, शस्त्रसाठा तयार ठेवून त्याचा वापर कुठे, कसा आणि कोणत्या कारणासाठी करायचा, याबाबत योजनाबद्ध कट रचण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. 

एटीएसने 10 ऑगस्टला मुंबईतील नालासोपारा येथील वैभव राऊत याच्यासह शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या तिघांना अटक केली. त्यांच्या घरी बॉम्ब, त्यासाठीचे साहित्य आणि शस्त्रसाठा सापडला. पाठोपाठ 13 जणांकडे कसून चौकशी झाली. आता त्यांच्याकडे सापडलेल्या सहा बनावट नंबर प्लेट कशासाठी वापरण्यात आल्या आहेत, यावर तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. 

मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबादमध्ये एकाच वेळी तपास यंत्रणा काम करीत आहेत. अटक केलेल्या तिघांना पाचही शहरांतून कोण मदत करीत होते, कोणाच्या आश्रयाखाली हा "उद्योग' चालला होता, त्यासाठी वित्तपुरवठा कोठून आला, याबाबत काही धागेदोरे हाती लागले आहेत, असे तपास यंत्रणांनी "सकाळ'ला सांगितले. परंतु, त्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. त्यातच अटकेतील आरोपींचा किंवा त्यांच्या साथीदारांचा नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांशी संबंध आहे का, याबाबतही तपास सुरू आहे. त्यामुळे घातपात आणि या पूर्वी झालेल्या हत्या, या असा दुहेरी तपास यंत्रणांकडून सुरू आहे. 

घातपाताचे केंद्र मुंबई की पुणे ? 
वैभव हा मुंबईतील नालासोपाऱ्याचा, गोंधळेकर मूळ साताऱ्याचा, तर शरद कळसकर औरंगाबाद येथील आहे. वैभवच्या नालासोपाऱ्यातील घर व दुकानातून, तर गोंधळेकरच्या पुण्यातील घरातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे घातपाती कृत्य घडविण्यासाठी मुंबई की पुणे हे केंद्रस्थानी होते काय? याबाबतही तपास सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com