आणखी ३ ध्वजस्तंभासाठी नगरसेवकांचा हट्ट

Flagpole
Flagpole

पुणे - नव्या तीन ठिकाणी अतिउंच ध्वजस्तंभ उभे करण्यासाठी पुणे महापालिकेने निविदा काढल्या आहेत. यापूर्वी महापालिकेने शनिवारवाडा आणि कात्रजमध्ये उंच ध्वजस्तंभ उभे केले. मात्र, देखभालीअभावी दोन्ही ठिकाणी राष्ट्रध्वज फडकत नाहीत. नव्या योजनेनुसार वडगाव शेरी, येरवडा आणि कर्वेनगरमधील उद्यानांत एकूण सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून उंच ध्वजस्तंभ उभे केले जाणार आहेत.

महापालिकेने यापूर्वी शनिवारवाड्याच्या आवारात ४५ मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभा केला. त्याआधी कात्रजमध्ये ७२ मीटर उंचीचा ध्वज फडकविला. या दोन्ही ध्वजांसाठी सव्वादोन कोटी रुपयांचा खर्च झाला. या स्तंभांवरील ध्वज देखभालीअभावी उतरवून ठेवावे लागले आहेत. ध्वजस्तंभ २५ मीटर उंचीपेक्षा अधिक नसावेत, असे प्रशासनाने सांगूनही स्थानिक नगरसेवकांनी त्यासाठी आग्रह धरला. परिणामी, प्रशासनाने या तीन भागांत ध्वज उभारण्याच्या निविदा काढल्या आहेत. पुण्यात २५ मीटरपेक्षा अधिक उंचीवर ध्वज उभा केल्यास हवेने तो फाटतो. त्यामुळे नगरसेवकांनी आग्रह धरू नये, अशी प्रशासनाची भूमिका होती.

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या धर्तीवर राज्यात उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून शनिवारवाडा आणि कात्रजमध्ये २०१६ मध्ये असे ध्वजस्तंभ उभारले. त्यांच्यावर सुमारे २५ फूट रुंदीचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. हवेच्या वेगामुळे तो खराब होऊ नये म्हणून त्यासाठी पॅराशूटचे कापड वापरले, तरीही पाऊस आणि वाऱ्यामुळे ध्वज फाटत गेले. सध्या तेथे केवळ स्तंभच आहेत.

नियोजित ध्वजस्तंभ
७८,९१,२४२ राजा छत्रपती शिवाजी उद्यान (प्रभाग क्र. ५, क)        
८४,९६,००० चिमा गार्डन (क्र. ६, ड)               
५६,९०,००० ज्ञानेश्‍वरी उद्यानाजवळील नवे क्रीडांगण (क्र. ३२, ड)
(आकडे रुपयांत)

शनिवारवाडा आणि कात्रजमधील ध्वज काढून ठेवले आहेत. नव्या तीन उद्यानांत ध्वजस्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निविदा काढल्या आहेत.
- श्रीनिवास कंदुल, प्रमुख, विद्युत विभाग, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com