तीन लाख शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

पुणे - शेती हा तोट्याचा धंदा असल्याचा समज खोडून काढण्यासाठी राज्य शासनाने `महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम'' तयार केला आहे. त्याअंतर्गत नव्या पिढीतील तीन लाख तरुण शेतकऱ्यांना कौशल्य व समूहावर आधारित शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. देशातील अशा स्वरूपाचा हा पहिलाच महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

पुणे - शेती हा तोट्याचा धंदा असल्याचा समज खोडून काढण्यासाठी राज्य शासनाने `महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम'' तयार केला आहे. त्याअंतर्गत नव्या पिढीतील तीन लाख तरुण शेतकऱ्यांना कौशल्य व समूहावर आधारित शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. देशातील अशा स्वरूपाचा हा पहिलाच महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

सकाळ माध्यम समूह, ॲग्रोवन, एपीजी लर्निंग आणि एपी ग्लोबालेतर्फे पुण्यात आयोजित केलेल्या ‘कृषी कल्चर’ या अनोख्या ज्ञानसोहळ्यात श्री. निलंगेकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. या प्रसंगी महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका श्वेता शालिनी, `एपी ग्लोबाले`चे कार्यकारी उपाध्यक्ष बॉबी निंबाळकर, कृषी खात्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, `अॅग्रोवन`चे संपादक आदिनाथ चव्हाण उपस्थित होते. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. एमएसीसीआयए, चतुर आयडीयाज एक्सक्यूबेटर, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, बोलेरो मॅक्सीट्रक प्लस, बोलेरो पीक अप, गोदरेज अॅग्रोवेट, इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कृषिकिंग हे या सोहळ्याचे प्रायोजक होते. 

श्री. निलंगेकर म्हणाले, दिल्लीतील राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेकडून कौशल्यावर आधारित हा राज्यव्यापी कार्यक्रम राबविला जातो आहे. त्यात शेतकऱ्यांचे कौशल्य गट तयार करून त्यांचे शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये रुपांतर करण्याचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी आम्ही सकाळ समूहाच्या एपीजी लर्निंग यांच्याशी नवरात्रात करार करणार अाहोत."   

"राज्यातील शेतीला सहकाराची जोड मिळाली होती. मात्र, कार्पोरेट गुण मिळाले नाहीत. सहकार व कार्पोरेट अंगाची जोड शेतीला प्रथमच देणारा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी लवकरच राज्यभर मोफत सुरू होईल," असे श्री. निलंगेकर यांनी जाहीर करताच उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने स्थलांतर थांबवून बिजनेस अंगाने स्मार्ट शेती करीत जास्तीत जास्त उत्पन्न मिवावावे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे, असे ते महणाले. 

श्रीमती श्वेता शालिनी म्हणाल्या की, "राजकीय नेत्यांचा मुलगा राजकारणात जातो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो पण शेतक-याचा मुलगा शेतीत जात नाही. कारण, शेतीला बिजनेस टच कधीच दिला गेला नाही. सकाळ समूह आणि एपी ग्लोबाले यांनी ही समस्या जाणून त्यावर सुरू केलेला कृति कार्यक्रम स्तुत्य आहे." 

"शेतकऱ्यांनी सोने शोधण्यासाठी जगात कुठेही न जाता आपली जमिनीतच पीकरूपी सोने शोधावे. ते कसे शोधावे हे आपल्याला विलास शिंदे यांच्यासारख्या युवा शेतकऱ्याने सह्याद्री फार्मर्स प्रोडयुसर कंपनीच्या रुपाने सांगितलेले आहे. महाराष्ट्राला त्यांचा गर्व असून असे दहा विलास शिंदे आपल्याला मिळाले तर आपण जगाला चांगला शेतीमाल पुरवू शकू," असेही श्रीमती शालिनी यांनी नमुद केले. 

अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी या वेळी राज्याच्या शेती व ग्रामीण विकासासाठी सकाळ माध्यम समूहाच्या रूपाने सुरू असलेल्या अनेक उपक्रमांचा आढावा घेतला. "शेतीला वाहिलेले जगातील एकमेव दैनिक म्हणून अॅग्रोवनची पायाभरणी १३ वर्षांपूर्वी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याकडून केली गेली.

`अॅग्रोवन`मधील ज्ञानाचा लाभ राज्यातील लाखो शेतकरी घेत आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यानी आपल्या घरांना देखील अॅग्रोवन हे नाव दिले," असे श्री. चव्हाण म्हणाले.   

डेक्कन कॉलेजच्या प्रांगणात कृषिकल्चर चर्चासत्राला जोडूनच आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्मार्ट शेतीमुळे जीवनात घडलेला बदल स्पष्ट करणा-या यशोगाथादेखील या वेळी काही महिला शेतकऱ्यांनी सादर केल्या. कुशल, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास, समूह शेती, गटशेतीचं तंत्र, अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची अभ्यासपूर्ण माहिती दिवसभर चाललेल्या चर्चासत्रात देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पल्लवी चौधरी यांनी केले. 

शेतकरी देतील अपॉइंटमेंट आणि ठेवतील पीएसुद्धा...!
महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक श्वेता शालिनी म्हणाल्या की, मी ब्राझिलमध्ये गेले तेव्हा तेथील शेतकऱ्याला भेटण्यासाठी मला अपॉइंटमेंट घेऊन तीन दिवस वाट पहावी लागली. तेथे शेतकरी स्वतःचे पीए ठेवतात. राज्यातील शेतकरी देखील कौशल्यावर आधारित उच्चतंत्राची शेती करावी. राज्य शासन त्यासाठी प्रयत्न करते आहे. त्यातून भविष्यात आपले शेतकरीदेखील स्वतःचे पीए ठेवतील. भेटीसाठी अपॉइंटमेंट देतील. सकाळ समूह व एपी ग्लोबाले यांनी आयोजिलेला हा कृषिकल्चर म्हणजे त्या दिशेने टाकलेले ध्येयाचे पहिले पाऊल ठरणार आहे.

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये 
 एकूण १८ महिन्यांचा खास प्रकल्प 
 ३४ जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने सुरवात
 तीन लाख शेतकऱ्यांसाठी मोफत प्रशिक्षणांचे आयोजन
 १८७३ मंडळ कार्यालयांच्या ठिकाणी ३ दिवसीय प्रशिक्षणे
 प्रत्येक ठिकाणी १५० प्रशिक्षणार्थींचा सहभाग
 विभागनिहाय मुख्य २० पिकांचा प्रशिक्षणात समावेश
 विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश 

प्रशिक्षणार्थींना मिळणारे फायदे
 गटशेती प्रवर्तक म्हणून शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र 
 दोन वर्षांपर्यंत दोन लाखांचा अपघाती विमा. शासकीय योजनांचा लाभार्थी म्हणून प्राधान्य
 बिनाव्याजी कर्ज उपलब्धतेसाठी साह्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 lakh Farmer Skills Training by Krishi Culture