जंतूसंसर्ग व क्षयरोगामुळे मनोरुग्णालयातील तीस जणांचा मृत्यू

दिलीप कुऱ्हाडे
शनिवार, 12 मे 2018

येरवडा (पुणे) : मनोरूग्णालयातील अस्वच्छता व अनारोग्य वातावरणामुळे गेल्या चार महिन्यात तब्बल तीस रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये क्षयरोग व जंतू संसर्गामुळे (सेफ्टी सेमिया) हे रुग्ण दगावल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद म्हणून दाखल करण्यात आली आहे.

येरवडा (पुणे) : मनोरूग्णालयातील अस्वच्छता व अनारोग्य वातावरणामुळे गेल्या चार महिन्यात तब्बल तीस रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये क्षयरोग व जंतू संसर्गामुळे (सेफ्टी सेमिया) हे रुग्ण दगावल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद म्हणून दाखल करण्यात आली आहे.

येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालय आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात नऊशे पुरूष रुग्ण तर सहाशे महिला रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या रुग्णालयातील अस्वच्छता आणि अनारोग्य वातावरणामुळे जानेवारी ते एप्रिल याचार महिन्यात तब्बल तीसजणांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांचे मृत्यूचे कारण क्षयरोग किंवा जंतूसंसर्ग असे दिले आहे. येरवडा पोलिस ठाण्यातील आकस्मित मृत्यूच्या नोंदवहित या तीसजणांच्या नावांची नोंद अाहे.

मनोरूग्णांमध्ये रंजना जाधव, विठ्ठल चव्हाण, फारूख सय्यद, सीमा काबंळे, बाळासाहेब अवचट, बाबुराव शिंदे, अक्सर शेख, अशोक शेट्टी, मंगल चव्हाण, बेबीताई जाधव यांचा जंतू संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे कारण डाॅक्टरांनी सांगितले आहे. कोडिंबा कांबळे, हिराबाई कड, बेबी शेख, बाळासाहेब शिंदे, अनिस सय्यद, रविंद्र अय्यर, निलेश गोसावी, आशाबाई म्हस्के, अनुसया पुजारी, जमिला शेख, शशिकांत बंड, संजीविनी कोळेकर यांचा मृत्यू क्षयरोगाने झाला आहे. उर्वरित रुग्णांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्यांचा व्हिसेरा राखून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘‘मनोरूग्णालयातील मोठ्या कक्षात तीन व लहान कक्षात दोन सफाई कर्मचाऱ्यांची चौवीस तास ड्यूटी लावली आहे. सफाईचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सफाई न केल्यामुळे आता पर्यंत पंचवीस हजार रूपये दंड आकारण्यात आले आहे. रुग्णालयात प्रवेश घेतानाच रुग्ण अशक्त व इतर आजारांनी पीडित असतात. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूची संख्या अधिक असू शकते.’’
- डाॅ. मधुमिता बहाले, अधिक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालय

‘‘रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे, हात न धुतल्यामुळे, पिण्याच्या पाण्यातून, खाण्यातून जंतू संसर्ग होऊ शकतो. योग्य व वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. तर क्षयरोग झालेल्या रुग्णाला वेळेवर औषधोपचार व जेवण न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.’’
- डाॅ. सुभाष कोकणे, वैद्यकीय तज्ज्ञ, पुणे महानगरपालिका

Web Title: 30 dies because of Bacterial infection and Tuberculosis in mental hospital