प्रेयसीच्या माफीसाठी पिंपरीत 300 बॅनर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू झाल्यावर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू झाल्यावर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की घोरपडी पुणे येथे राहणारा तरुण महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याचे पुण्यात राहणाऱ्या प्रेयसीसोबत भांडण झाले. त्यानंतर प्रेयसी मुंबईला गेली. ती मुंबईहून येण्याच्या मार्गावर त्याने तिची माफी मागण्यासाठी रहाटणी, पिंपळे सौदागर भागात 300 फलक लावले. त्या फलकावर त्या मुलीचे नाव आणि आय एम सॉरी असा मजकूर होता. या फलकांबाबत शहरात चर्चा सुरू झाली. या चर्चेची दखल वाकड पोलिसांनी घेतली. त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये चिंचवडमधील तरुणाचे नाव समोर आले. त्याने दिलेल्या माहितीनंतर घोरपडी येथील तरुणाची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी या दोन तरुणांची चौकशी सुरू केली असता, त्यांनी सुरवातीला शॉर्ट फिल्मच्या प्रमोशनसाठी हे फलक लावण्याचे सांगितले. मात्र, पोलिसांकडून झालेल्या प्रश्‍नांच्या सरबतीनंतर त्यांनी प्रेयसीची माफी मागण्यासाठी हे फलक लावण्याचे सांगितले. त्यांनी या फलकांबाबत महापालिकेची परवानगी घेतलेली नसल्याने त्यांच्या विरोधात आकाशचिन्ह परवाना विभाग कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले.

Web Title: 300 Banner for Lover Apologies in Pimpri