आणखी 300 रिक्षा स्टॅंडची गरज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पुणे - शहराची हद्द वाढत असताना त्या प्रमाणात रिक्षा स्टॅंडची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. त्यासाठीचा प्रस्ताव संघटनांनी सादर करण्याची तयारी केली असून, आणखी ३०० रिक्षा स्टॅंडची शहराला आवश्‍यकता आहे, असे या संघटनांनी म्हटले आहे. 

पुणे - शहराची हद्द वाढत असताना त्या प्रमाणात रिक्षा स्टॅंडची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. त्यासाठीचा प्रस्ताव संघटनांनी सादर करण्याची तयारी केली असून, आणखी ३०० रिक्षा स्टॅंडची शहराला आवश्‍यकता आहे, असे या संघटनांनी म्हटले आहे. 

महापालिकेच्या हद्दीत लोहगाव, मुंढवा, केशवनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची, हडपसर-साडेसतरा नळी, आंबेगाव खुर्द- बुद्रुक, उंड्री, धायरी, शिवणे, उत्तमनगर आदी ११ गावांचा समावेश झाला आहे. येत्या वर्षात आणखी २३ गावांचा समावेश शहरात होणार आहे. शहराची सुमारे २५० चौरस किलोमीटर हद्द होती. आता ११ गावांचा समावेश झाल्यामुळे ही हद्द ३३० किलोमीटरची झाली आहे. शहराच्या चारही दिशांच्या उपनगरांचा विस्तार वाढत आहे.

परंतु, त्या प्रमाणात रिक्षा स्टॅंडची संख्या वाढलेली नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या रिक्षांचे प्रमाण वाढत आहे. उपनगरांतही स्टॅंडची जागा निश्‍चित झाल्यास रिक्षाचालक तेथे थांबू शकतील आणि प्रवाशांनाही रिक्षा उपलब्ध होऊ शकेल, असे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे.

यापूर्वी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) बैठकीत  रिक्षा स्टॅंड निश्‍चित होत आणि त्या ठिकाणी महापालिका फलक लावत असे. परंतु, मधल्या काळात हे अधिकार वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबतची प्रक्रिया त्यांनी पूर्ण करावी, असेही त्यांचे म्हणणे आहे.

982 सध्याचे रिक्षा स्टॅंड 
250 चौरस किलोमीटर - गावांचा समावेश होण्यापूर्वीची शहराची हद्द
330 चौरस किलोमीटर शहराची सध्याची हद्द

शहराची भौगोलिक हद्द आणि लोकसंख्या वाढत आहे. त्याप्रमाणात म्हणजे सुमारे २५ टक्‍क्‍यांनी रिक्षा स्टॅंडचीही संख्या वाढविणे गरजेचे आहे. केवळ पाट्या लावून स्टॅंड करण्यापेक्षा तेथे रिक्षाचालकांसाठी सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. स्मार्ट रिक्षा स्टॅंड हवे आहेत. 
- नितीन पवार, रिक्षा पंचायत

शहरात गेल्या अनेक वर्षांत रिक्षा स्टॅंडची संख्या वाढलेली नाही. रिक्षा हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे शहराच्या विकासाचे नियोजन करताना त्यात रिक्षांना गृहित धरले पाहिजे. तसेच शहराची हद्द वाढत असताना रिक्षा स्टॅंडची संख्याही वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रस्ताव सादर करीत आहोत. 
- बापू भावे, पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन

रिक्षा स्टॅंडची संख्या वाढली पाहिजे, यात शंका नाही. त्यासाठी वाहतूक पोलिस सकारात्मक आहेत. याबाबतचा प्रस्ताव आल्यावर त्याला मंजुरी दिली जाईल. 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक 

Web Title: 300 rickshaw stand need