शिष्यवृत्तीसाठी तीनशे शाळा नोंदणीविनाच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

स्वतंत्र पोर्टल
अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांची ‘एनएसपी’ या पोर्टलवर माहिती भरणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी शाळेचे नाव, युडायस क्रमांक आणि मुख्याध्यापकांचे नाव व मोबाईल क्रमांक ही माहिती भरणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळा व विद्यार्थ्याला स्वतंत्र यूजर आयडी तयार करून ऑनलाइन अर्ज भरावयाचा आहे. त्यावर पासवर्डचा वापर करून शाळा लॉगिन करायची आहे. त्यानंतर प्रोफाइल अपडेट केल्यावर नोडल अधिकाऱ्यांकडून अर्ज ऑनलाइन क्रमांक तपासून घ्यायचा आहे. स्वतंत्र पोर्टल तयार केल्याने शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेत सुसूत्रता येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पिंपरी - केंद्र सरकार पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रक्रिया सुरू झाली असली तरी चिंचवड शहरातील ३०४ शाळांनी ऑनलाइन नोंदणीच केली नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याबाबत अडचण होण्याची शक्‍यता आहे. 

मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध, पारशी व जैन या अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारमार्फत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. इच्छुक विद्यार्थ्यांना नवीन शिष्यवृत्ती व शिष्यवृत्तीचे नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्‍यक असते.

त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यास सुरवात झाली आहे. ३१ ऑक्‍टोबरपर्यंत दिलेली मुदत आता १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज केवळ ऑनलाइन स्वीकारले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. शहरात प्राथमिक शाळांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २० हजार आहे. यासाठी शाळांनी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. मात्र, पिंपरी विभागातील १४९ आणि आकुर्डी विभागातील १५५ अशा ३०४ शाळांनी अद्याप नोंदणी केलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 300 school without registration for Scholarship