एकाच चाकात 26 पंक्चर दाखवून तीन हजार रुपये उकळले | Cheating | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bike Puncture
एकाच चाकात 26 पंक्चर दाखवून तीन हजार रुपये उकळले

एकाच चाकात 26 पंक्चर दाखवून तीन हजार रुपये उकळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - तुमच्या दुचाकीच्या मागच्या चाकातील हवा कमी झाली असून पंक्चर तपासून घ्या, असे सांगत दुकान मालकासह त्याच्या साथीदारांनी वाहनचालकाची फसवणूक करून लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी एकाच चाकात 26 पंक्चर दाखवून वाहनचालकडून तीन हजार रुपये उकळले आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या दोन साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत राजु वाघमारे (वय 28, रा. अजिंठा मित्रमंडळ, बोपोडी) आणि दुकान मालक फ्रान्सीस सनी अमोलीक (वय 50, रा. भाऊ पाटील चाळ, बोपोडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या बाबत संदीप वसंत शिंदे (वय 35, रा. आझाद चौक, लोहगाव) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: ड्रग्ज सापडण्याआधी गुजरातच्या 'त्या' बंदराचं नाव वेगळं - कोल्हे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 13) सायंकाळी फिर्यादी हे निगडीला जात होते. ते पुणे - मुंबई रस्त्यावर बोपोडीत असलेल्या गोपी चाळ जवळ पोहचले. त्यावेळी दुचाकीवरून जात असताना दुसर्‍या दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना तुमच्या दुचाकीच्या मागच्या चाकातील हवा कमी झाल्याचे सांगितले. तुम्ही पडताल म्हणत हवा तपासून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. शिंदे यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि शेजारी असलेल्या आरोपींच्या पंक्चरच्या दुकानात ती दाखवली. दुकान चालकाने पंक्चर तपासली असता वाघमारे आणि अमोलीक यांनी लोखंडी टोच्याने दुचाकीच्या मागच्या टायरला 26 पंक्चर केल्या. त्यानंतर फिर्यादी यांच्याशी वाद घालून त्यांच्याकडून तब्बल तीन हजार उकळले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गणेश पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

loading image
go to top