साडेतीन कोटींची शेअर्सद्वारे फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पुणे - मृत भागधारकांच्या नावाचे शेअर्स एका कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे बनवून लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी नामांकित कंपनीची तब्बल तीन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. 

पुणे - मृत भागधारकांच्या नावाचे शेअर्स एका कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे बनवून लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी नामांकित कंपनीची तब्बल तीन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. 

याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. सोनू निर्मल अगरवाल (वय ३८, रा. मुंबई) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्फा लावल कंपनीशी लिंक इनटाइम इंडिया ही कंपनी निगडित आहे. अल्फा लावल कंपनीने संबंधित कंपनीच्या शेअर्सच्या बदल्यात चार हजार रुपये प्रतिशेअर्स देण्याचे ठरले होते. त्यानुसार भागधारकांची रक्कम लिंक इनटाइम कंपनीने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या व त्यांनी दिलेल्या रेकॉर्डवरून भागधारकांना देण्यात येणार होती. त्या वेळी काही भागधारक हे मयत, तर काहींचे पत्ते बदलले असल्याचे निष्पन्न झाले होते. ही बाब लक्षात घेऊन लिंक इनटाइम कंपनीच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून १८ भागधारकांची ओळखपत्रे, रहिवासी पुरावा, बॅंकेची कागदपत्रे व मागणीपत्र बनावट तयार करून ३ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. आरोपी अगरवाल याने संबंधित व्यक्तींचे बॅंकेमध्ये बनावट खाते उघडून दिले होते. त्यावरून त्यास अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक मोहन जाधव, पोलिस कर्मचारी अमृता हरबा व संदीप गिऱ्हे यांनी ही कारवाई केली.

Web Title: 3.5 Crore Rupees Cheating by Shares Crime

टॅग्स