शहरात छत्तीस ‘ब्लॅक स्पॉट’ 

पांडुरंग सरोदे 
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे  - वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्याच्या घटनांमुळे झालेल्या अपघातांमध्ये शहरात तीन वर्षांत तब्बल १३३१ जणांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्ती अपंगत्वाचे आयुष्य जगत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विशेषतः दर एक किलोमीरटच्या परिसरात अपघात घडत असून, दररोज किमान एकाचा जीव जात असल्याची सद्यःस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी वाहतूक शाखेने ३६ अपघातप्रवण क्षेत्राची (ब्लॅक स्पॉट) निवड करून उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

पुणे  - वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्याच्या घटनांमुळे झालेल्या अपघातांमध्ये शहरात तीन वर्षांत तब्बल १३३१ जणांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्ती अपंगत्वाचे आयुष्य जगत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विशेषतः दर एक किलोमीरटच्या परिसरात अपघात घडत असून, दररोज किमान एकाचा जीव जात असल्याची सद्यःस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी वाहतूक शाखेने ३६ अपघातप्रवण क्षेत्राची (ब्लॅक स्पॉट) निवड करून उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

शिक्षण, रोजगार व निवासासाठी चांगले शहर म्हणून पुण्यात दररोज हजारो नागरिक दाखल होतात. मिळेल तिथे शिक्षण, रोजगार आणि त्यानंतर वास्तव्य असे चित्र सध्या शहरामध्ये आहे. नोकरी, शिक्षण तसेच अन्य कारणास्तव बाहेरील लोकांचे मोठ्या प्रमाणात ये-जा असते. हा प्रवास करताना अनेकदा स्वतःकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे किंवा समोरच्या व्यक्तीकडून चुकीच्या पद्धतीने, भरधाव वाहन चालवून होणाऱ्या अपघातात काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे, तर काहींच्या वाट्याला कायमचे अपंगत्व येत असल्याची सद्यःस्थिती आहे.

शहराच्या विविध भागांत घडणारे हे मृत्युतांडव थांबविण्यासाठी वाहतूक शाखतर्फे दर तीन वर्षांनी अपघातप्रवण ठिकाणे निवडली जातात. तीन वर्षांपूर्वी ब्लॅक स्पॉटची संख्या २२ होती. त्यामध्ये १४ ठिकाणांची वाढ होऊन ही संख्या आता ३६ पर्यंत पोचली आहे. त्यामध्ये वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयासमोर सर्वाधिक २६ अपघात झाले आहेत. वाकड पुलाजवळही २६ अपघात होऊन काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दर एक किलोमीटर अंतरामध्ये पाच अपघात होतात. त्यामध्ये किमान तीन व्यक्तींचा मृत्यू होत असून, दोन व्यक्ती गंभीर जखमी होत असल्याचे चित्र आहे. 

‘‘माझे ८१ वर्षांचे वडील किसन तुळसे यांना अज्ञात भरधाव वाहनचालकाने उडविले. त्याने त्यांना रुग्णालयात नेण्याचेही सौजन्य दाखविले नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आमचे वडील गेले, अशी वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी भरधाव वाहनचालकांवर नियंत्रण आणले पाहिजे. आणखी किती जणांचा बळी जाण्याची वाट पाहायची? रस्त्यांवर गतिरोधकापासून ते आवश्‍यक उपाययोजना प्रशासनाने केल्या पाहिजेत. अपघातानंतर रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठीही प्रयत्न व्हायला पाहिजेत. एकूणच अपघात कसे टाळता येतील, याचा विचार व्हावा.’’ 
- भीमराव तुळसे, येरवडा. 

अपघातांची कारणे 
* मद्यपान करून वाहने चालविणे 
* भरधाव वाहने चालविणे 
* ‘नो एंट्री’मधून सर्रासपणे ये-जा करणे
* खराब रस्ते 
* वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे
* रस्त्यांभोवतीची अतिक्रमणे 

अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना 
* रस्त्यांभोवतीचे अतिक्रमण काढणे
* खराब ररस्ते दुरुस्त करणे
* आवश्‍यक ठिकाणी गतिरोधक बसविणे किंवा काढणे
* झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या तयार करणे
* पिवळ्या पट्ट्यांची आखणी करणे 
------------------------------------------------------
वर्ष              अपघात             मृत्यू             गंभीर 
२०१५           ४१९             ४३८            १२०५ 
२०१६           ३९७             ४१०            ६७० 
२०१७           ३६०             ३६८             ------ 
२०१८          १०७               ११५            ------ 

सातत्याने अपघात होणाऱ्या ठिकाणांची निवड करून उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. महापालिका, कॅंटोन्मेंट बोर्ड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना रस्ते व अन्य आवश्‍यक दुरुस्ती व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा. 

शहराच्या विविध भागांतील ‘ब्लॅक स्पॉट                  अपघातांची संख्या 
 माई मंगेशकर रुग्णालयासमोर, वारजे    -    २६
 वाकड उड्डाण पूल परिसर    -    २६
 बावधन पूल    -    २१
 खडी मशिन, कोंढवा    -    २०
 डुक्कर खिंड, वारजे    -    १४
 कात्रज चौक    -    १३
 पुनावळे पूल    -    १३
 फुरसुंगी रेल्वे पूल, हडपसर    -    १३
 वडगाव उड्डाण पूल, सिंहगड रस्ता    -    ११
 नवले पूल, सिंहगड रस्ता    -    १०

Web Title: 36 accident spot in pune city