चाळीस टक्के विद्यार्थी गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी प्रवेश मिळाला नसल्याची एका मुलीची तक्रार वगळता रविवारी परीक्षा सुरळीत पार पडली. एका विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर मुलीचे छायाचित्र छापून आले; पण त्याची शहानिशा करून विद्यार्थ्याला परीक्षेला बसविल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. परीक्षेला ४० टक्के विद्यार्थी गैरहजर राहिले.

पुण्यात दोन सत्रांत ही परीक्षा झाली. एकूण ७४ परीक्षा केंद्रांवर सकाळी सातपासून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळचे सत्र साडेनऊ ते साडेअकरा असे होते. केंद्रावर परीक्षेच्या वेळेपूर्वी दोन तास उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी केंद्रांचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. दुपारचे सत्र अडीच वाजता असल्याने दोन वाजून वीस मिनिटांनी प्रवेशद्वार बंद करण्यात आले.

हुजूरपागा शाळेतील केंद्रात भोसरी येथून आलेली बबिता मोरे ही विद्यार्थिनी ९.२० वाजता आली. त्याच वेळी प्रवेशद्वार बंद झाले. त्यामुळे तिला परीक्षेला जाता आले नाही. तिने विनंती केली; पण नियमानुसार प्रवेशाची वेळ संपल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिने पोलिसांकडे मदत मागितली. परंतु तिला परीक्षा देता आली नाही. जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षातील उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण आणि तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबर भालदार या विद्यार्थ्याच्या हॉल तिकिटावर मुलीचा फोटो छापला होता. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार त्या उमेदवाराची ओळख पटविण्यासाठी त्याच्याकडील अन्य कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला परीक्षेस बसू देण्यात आले.

विद्यार्थ्यांची उपस्थिती
सत्र           उपस्थिती         गैरहजर
पहिले          १८३११          १२१२९
दुसरे सत्र      १८०५७           १२३७२ 

केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा एकूण तीस हजार जण देणार होते. त्यातील बारा हजारांहून अधिक जण गैरहजर राहिले. ही परीक्षा सुरळीत पार पडली. प्रवेश मिळाला नसल्याच्या तक्रारी नाहीत.
- प्रल्हाद हिरामणी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय

Web Title: 40 percent student absent in UPSC Exam