कोरोनाबाबत पुणे पोलिस लई हुशार !

पांडुरंग सरोदे @spandurangSakal
रविवार, 10 मे 2020

- बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या सर्वेक्षणातून माहिती उघड 

- लॉकडाऊनच्या नियमांबाबत अनेक नागरिक बेशिस्त असल्याचे 42 टक्के पोलिसांचे निरीक्षण

पुणे : कोरोनाविरुद्ध दिवस रात्र लढा देणारे पुणे पोलिस कोरोनाबाबत भलतेच हुशार असल्याची माहिती पुढे आली आहे. बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय व ससुन रुग्णलयाच्या बालरोग चिकित्साशास्र विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 98.5 टक्के पोलिसांना कोरोनाबाबत चांगले ज्ञान असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु अनेक नागरिक लॉकडाऊनच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलिसांवरील ताण वाढत असल्याचे  निरीक्षण 42 टक्के पोलिसांनी या सर्वेक्षणाद्वारे नोंदविले आहे.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करून घरी परतली; पतीने केले अशाप्रकारे स्वागत...

बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय व ससून रूग्णालयाच्या बालरोग चिकित्साशास्र विभागकडून कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे सर्वेक्षण करण्यात आले. ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभागाच्या विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ.आरती किणीकर, सहायक प्राध्यापक डॉ.नरेश सोनकवडे व त्यांच्या 7 ते 8 जणाच्या पथकाने  "कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पुणे पोलिसांचे "ज्ञान,दृष्टिकोण व सेवा' हा विषय घेऊन गुगल पद्धतीनुसार अभ्यासात्मक सर्वेक्षण केले होते.

परप्रांतीय मजुरांचा वनवास संपता संपेना... 

या सर्वेक्षणामध्ये 8 हजार 651 पैकी 5 हजार 692 म्हणजेच 66 टक्के पोलिसांनी सहभाग घेत प्रतिसाद नोंदविला. लॉकडाऊन असतानाही नागरीक नियमांचे पालन करीत नाहीत. विशेषतः सामाजिक अंतर ठेवणे, पोलिसांच्या कामात अडथळा आणणे अशा अनेक नियम नागरीक पायदळी तुडवीत असल्याचे 42 टक्के म्हणजेच 2344 पोलिसांच्या निदर्शनास आले. तर 24 पोलिसांना (पाच टक्के) बेशिस्त नागरीकांनी शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केल्याचेही या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. तर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनाच धारेवर धरीत नागरीकांनी पाच पोलिसांविरुद्ध तक्रार केल्याचे स्पष्ट केले आहे. नागरीकांना जेवण पुरविण्याच्या नावाखाली रस्त्यावर फिरणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांच्या लोकांकडूनही सामाजिक अंतर ठेवण्यासारखे नियम सर्रासपणे पायदळी तुडविले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

याच सर्वेक्षणामध्ये पुणे पोलिसांना कोरोनाविषयी असलेल्या ज्ञानाचीही परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये 98.5 टक्के पोलिस उत्तीर्ण झाले. 98.5 टक्के पोलिस कोरोनाबाबत जागरुक आहेत. तर पोलिस प्रशासनाकडून कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्‍वभुमीवर पुरविल्या जाणाऱ्या सोई-सुविधांबाबत 95 टक्के पोलिस समाधानी असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. 96 टक्के पोलिसांकडून स्वतःला व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्‍यक काळजी घेतली जात असल्याचे सर्वेक्षणातून नमूद केले आहे. 

124 पोलिस अधिकारी व कर्मचारी कोरोनामुळे आपल्या कुटुंबापासून, विशेषतः आपल्या मुलांपासून दूर राहात असल्याची बाब पुढे आली आहे. 

आता आम्ही घरी जायचे कसे? राज्य सरकारने केली विद्यार्थ्यांची फसवणूक​

कोरोनाचा पोलिसांना बसणारा फटका

- वाहतुक सुविधा नसल्याने ये-जा करताना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे 8 टक्के म्हणजेच 432 पोलिसांनी नमूद केले आहे. 
- कोरोनामुळे 5 टक्के म्हणजे 297 पोलिसांना चहा, नाश्‍ता व जेवण मिळाले नाही.
- स्वच्छतागृहांचा अभाव असल्यामुळे महिला पोलिस कर्मचाऱ्यांची कुचंबना 
- 365 कर्मचाऱ्यांना कुटुंबासाठी दैनंदिन किराणा किंवा अन्य वस्तु आणण्यास अडचण आली 
- 104 जणांना दवाखाने, खासगी रूग्णालये खुले नसल्याचा फटका बसला 
- 70 पोलिसांना गाडी दुरूस्त करण्यास अडचण 
- 35 पोलिसांना त्यांचा पगार कमी आल्याने अडचण आली 

घराच्या ओढीने काळीज तुटत होतं, पण असा झाला घोळ... 

" बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या सर्वेक्षणात 98.5 टक्के पोलिस कोरोनाबाबत जागरुक असल्याचे तर 95 टक्के पोलिस त्यांना पोलिस प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पुरविल्या जाणाऱ्या सोई-सुविधांबाबत समाधानी असल्याचे स्पष्ट झाले. 96 टक्के पोलिसांकडून स्वतः व कुटुंबाला कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी पुरेपर काळजी घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.''
- डॉ.के.वेंकटेशम, पोलिस आयुक्‍त. 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करून घरी परतली नर्स; पतीने केले अशाप्रकारे स्वागत...

" आम्ही केलेल्या सर्वेक्षणात पुण्यातील सुमारे 99 टक्के पोलिसांना कोरोनाविषयी चांगले ज्ञान असल्याचे आढळले. नागरीकांकडुन लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने पोलिसांमध्ये ताण वाढत आहे. सर्वेक्षणात महिला पोलिस आपल्या कुटुंबाबात अधिक काळजी करत असल्याचे समजले. काही पोलिसांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. पोलिस आयुक्तांनी अहवालाची दखल घेतली आहे."
- डॉ. आरती किणीकर, प्राध्यापक व विभागप्रमुख. बालरोग चिकित्साशास्र विभाग, बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय व ससून रूग्णालय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42 percent pune police observed that many citizens were unaware of the lockdown rules