बांधकाम मजुरांना घरासाठी साडेचार लाखांचे अनुदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

पुणे - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अडीच लाख रुपयांच्या अनुदानाव्यतिरक्त बांधकाम मजुरांना अतिरिक्त दोन लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडून (महाहाउसिंग) देण्यात येणार आहे. दुसऱ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या राज्यातील सुमारे तीस लाख बांधकाम मजुरांना स्वत:च्या घरासाठी जवळपास साडेचार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

पुणे - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अडीच लाख रुपयांच्या अनुदानाव्यतिरक्त बांधकाम मजुरांना अतिरिक्त दोन लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडून (महाहाउसिंग) देण्यात येणार आहे. दुसऱ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या राज्यातील सुमारे तीस लाख बांधकाम मजुरांना स्वत:च्या घरासाठी जवळपास साडेचार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

प्रत्येक हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने २०१५ मध्ये ‘प्रधानमंत्री आवास योजना-सर्वांसाठी घरे’ ही योजना सुरू केली आहे. राज्यात २०२२ पर्यंत १९ लाख ४० हजार घरे बांधणीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. हे उद्दिष्ट विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांसह गृहप्रकल्पांनादेखील शासनाने विविध सवलती दिल्या आहेत. तसेच, या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी गृहनिर्माण विभाग, म्हाडा, नगर परिषद संचालनालय आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, घरकुलांच्या निर्मितीस वेग देऊन निश्‍चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हाडा या एकाच संस्थेवर अवलंबून राहणे उचित होणार नाही. त्यामुळे शासनाने या संस्थेव्यतिरिक्त अन्य एका यंत्रणेची निर्मिती केल्यास योजनेतील घरकुलांच्या बांधकामास गती मिळेल, या उद्देशाने ‘महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळा’ची स्थापन केली आहे. 

म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित व अन्य इच्छुक शासकीय संस्थांकडून प्रत्येकी १०० कोटी इतक्‍या निधीच्या समभाग गुंतवणुकीतून हे महामंडळ निर्माण केले आहे. याशिवाय खुल्या बाजारातून भांडवल उभारण्याची, तसेच बॅंका आणि अन्य वित्तीय संस्थांकडून कर्जे उभारण्याची महामंडळाला मुभा देण्यात आली आहे. 

बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी मध्यंतरी राज्य सरकारने मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून सर्व बांधकाम मजुरांना स्वतंत्र ओळखपत्रे देण्यात आली आहेत. या मजुरांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानाव्यतिरिक्त बांधकाम मजुरांना स्वत:चे घर घेण्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान महामंडळाच्या माध्यमातून दिले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे मुख्याधिकारी राजेंद्र मिरगणे यांनी दिली.

महामंडळाची उद्दिष्टे
  २०२२ पर्यंत किमान ५ लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती 
  प्रत्येक प्रकल्प हा किमान पाच हजार घरकुलांचा 
  आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी २.५ एफएसआय

 मी सेट्रिंगची कामे करतो. माझे स्वत:चे घर नाही, भाडेकराराने घेतलेल्या घरात राहतो. केंद्र-राज्य सरकारच्या व्यतिरिक्त महामंडळाच्या माध्यमातून अतिरिक्त दोन लाख म्हणजे साडेचार लाखांची मदत मिळणार असल्यामुळे मला घर घेणे शक्‍य होणार आहे.
- आदेश अगळे, कात्रज, पुणे

Web Title: 4.5 lakh Rupees to Construction Labour for home by