पीएमपीच्या साडेचारशे बसची होणार तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे - वारजे येथील पीएमपी बस अपघातानंतर भाडेतत्त्वावरील 450 बसच्या स्टीअरिंग, ब्रेकसह संपूर्ण तपासणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे; तसेच, बसच्या दैनंदिन देखभाल-दुरुस्तीवरही जादा लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. 

पुणे - वारजे येथील पीएमपी बस अपघातानंतर भाडेतत्त्वावरील 450 बसच्या स्टीअरिंग, ब्रेकसह संपूर्ण तपासणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे; तसेच, बसच्या दैनंदिन देखभाल-दुरुस्तीवरही जादा लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. 

पीएमपी बसचा सोमवारी सकाळी अपघात झाला. संबंधित बस भाडेतत्त्वावरील आहे. या बसची स्टीअरिंग लूज होऊन तुटल्यामुळे नियंत्रण सुटल्याचा दावा चालकाने केला आहे. मात्र, बसची तांत्रिक तपासणी झाल्यावर अपघातामागचे नेमके कारण समजू शकेल. याबाबतचा अहवाल मिळण्याची शक्‍यता आहे, असे पीएमपीच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक डी. एम. माने यांनी सांगितले. त्यात चालकाचा निष्काळजीपणा आढळल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाडेतत्त्वावरील बस नव्या आहेत. तरीही पुरेशा देखभाल-दुरुस्तीअभावी त्यांच्या बसचे ब्रेकडाउनचे प्रमाण जास्त असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. 

दरम्यान, अधिक तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पीएमपीची अपघातग्रस्त बस ताब्यात घेतली आहे. अपघात झाल्यावर माने आणि अपघात विभागाचे प्रमुख संजय कुसाळकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी पीएमपीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात भाडेतत्त्वावरील बससह सर्व आगारांमधील बसेसची तपासणी करण्याचा आदेश त्यांनी दिला. भाडेतत्त्वावर 5 कंत्राटदारांच्या 650 बस पीएमपीने घेतल्या आहेत. त्यातील 450 बस मार्गांवर धावत आहेत. 

Web Title: 450 PMP bus Checking