
लागवडी विना 4500 बांबूची रोपे रोपवाटिकेत पडून
पुणे : लॉकडाउनमुळे राज्याची तिजोरी रिकामी झालेली असतानाच पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने चक्क 50 लाख रुपयांच्या बांबूच्या रोपांची खरेदी केल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात शहराच्या विविध ठिकाणच्या उद्यानात बांबूची लागवड करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, आर्थिक वर्ष संपत असल्याने व बिल काढण्याची घाई झाल्यामुळे साडेचार हजार बांबूची रोपे लागवडी विना महापालिकेच्या रोपवाटिकेत ठेवण्याची नामुष्की उद्यान विभागावर आली आहे.
आणखी वाचा-वारकऱ्यांनी कोरोनासारख्या या भयंकर संकटांनाही दिलंय तोंड...
पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बांबू लागवडीसाठी तब्बल 1 कोटी रुपये तरतूद होती. ही बाब वडगावशेरी - खराडी प्रभाग क्रमांक चारमधील नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांच्या निदर्शनात आली. त्यांनी फेब्रुवारीमध्ये उद्यान विभागाकडे या निधीची मागणी केली. खराडी ते शिवणे रस्त्यावरील मुळा- मुठा नदीकाठाशेजारी ही रोपे लावण्याचा त्यांचा मानस होता. त्याप्रमाणे उद्यान विभागाने निविदा प्रसिद्ध केली. मात्र, या निविदेमध्ये बांबू खरेदी व लागवड करणे असा शब्दप्रयोग करणे अपेक्षित होते. परंतु, बांबू पुरवणे असा शब्दप्रयोग झाल्यामुळे पुढील अनर्थ घडला.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
नगररस्ता (वडगावशेरी) क्षेत्रीय कार्यालयाने सोयीसाठी प्रत्येकी दहा लाखाचे दहा टेंडर काढले होते. त्यामध्ये दोन ठेकेदाराने प्रत्येकी पाच टेंडर भरले. त्यापैकी एकाच ठेकेदाराने मार्च अखेर (लॉकडाउनमध्ये) 50 लाखाचे साडेचार हजार बांबूची रोपे दिली. मात्र लॉकडाउनमध्ये बांबूच्या रोपांची लागवड तरी कसे करणार त्यामुळे उद्यान विभागाची पंचायत झाली. त्यासाठी लागवडीसाठी स्वतंत्र निधीची सुद्धा आवश्यकता होती. त्यामुळे भर उन्हाळ्यात ही बांबूची रोपे जोपासायची तरी कशी असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला. त्यावर मार्ग म्हणून त्यांनीच ही रोपे महापालिकेच्या रोपवाटिकेत ठेवले. आता पावसाळ्यात ही रोपे वडगावशेरी येथील एका मोकळ्या जागेत लावण्याचा त्यांचा विचार आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात उद्यान विभागासाठी 1 कोटी रुपयांच्या बांबूच्या रोपांची खरेदी व लागवडीसाठी विशेष तरतूद होती. हा निधी खराडी येथे खर्च करण्याची मागणी केली. मात्र, उद्यान विभागाच्या चुकीमुळे ही रोपे लागवडी विना रोपवाटिकेत पडून राहिली आहेत.
- भैय्यासाहेब जाधव, नगरसेवक, पुणे महानगरपालिका
विविध प्रकारच्या पंधरा फुटापर्यंतची बांबूची 4552 रोपे महापालिकेच्या रोपवाटिकेत ठेवली आहेत. पावसाळ्यात त्यांचे रोपण करण्यात येणार आहे.
- राजेश बनकर, वृक्ष अधिकारी तथा सहायक महापालिका आयुक्त, वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय