
संततधार पावसाने पुण्याला झोडपले
पुणे - बुधवारी (ता. १३) पहाटेपासूनच पुणे शहर व परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. मागील आठवड्यापासून शहरात सक्रिय झालेल्या पावसाने या आठवड्यात नवे उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. बुधवार पहाटेपर्यंत ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
बुधवारी सकाळपासूनच शहर परिसरात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघणाऱ्या नोकरदारांसह व्यावसायिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जवळपास दहा दिवसांपासून पुणेकरांनी सूर्यनारायणाचे दर्शन भेटलेले नाही. सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गारवा पसरला आहे. आज दिवसभर सर्व परिसरात मध्यम ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडताना योग्य ते खबरदारी घ्यावी असा इशारा हवामान खात्यात दिला आहे.
बुधवारी पहाटे तीन वाजेपर्यंतचा पाऊस :
- शिवाजीनगर : ४९
- पाषाण : ५०
- लोहगाव : २८