PMP Bus : ‘पीएमपी’च्या ताफ्यात आणखी ५०० बस

‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत ४०० सीएनजी बस भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता मिळाली. यापूर्वी १०० बस स्वमालकीच्या घेण्याबाबतचा निर्णय झाला होता.
PMP Bus
PMP BusSakal

पुणे - ‘पीएमपी’च्या ताफ्यात जूनपर्यंत ५०० सीएनजी बस दाखल होणार आहेत. यामध्ये ४०० भाडेतत्त्वावर, तर १०० स्वमालकीच्या असतील. याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बसची संख्या वाढणार असली, तरी ठेकेदारांच्या बसची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे ‘पीएमपी’मध्ये पुन्हा ठेकेदारांचे वर्चस्व वाढणार असून येत्या काळात ‘पीएमपी’साठी डोकेदुखी ठरू शकते.

‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत ४०० सीएनजी बस भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता मिळाली. यापूर्वी १०० बस स्वमालकीच्या घेण्याबाबतचा निर्णय झाला होता. दोन्ही मिळून ५०० बस जूनपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. एप्रिल-मे सुट्ट्यांचा काळ असल्याने प्रवासी संख्या कमी असते. जूनपर्यंत नवीन बस दाखल होत असल्याने विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. बस १२ मीटर आकाराच्या आहेत.

सध्या ई-बसच्या पुरवठ्यासंदर्भात अडचणी येत असून गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ‘पीएमपी’ ई-बसच्या प्रतीक्षेत आहे. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून ‘पीएमपी’ने ‘सीएनजी’ बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी असल्यामुळे बसची उपलब्धता वाढविणे आता अपरिहार्य आहे.

ठेकेदारांवरचे अवलंबित्व वाढणार

सध्या ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या ९८१, तर सात ठेकेदारांच्या मिळून एक हजार ९८ बस आहेत. भाडेतत्त्वावरील ४०० सीएनजी बस दाखल झाल्यावर ठेकेदारांच्या एक हजार ४९८, तर स्वमालकीच्या एक हजार ८१ बस होतील. परिणामी ठेकेदारांवरचे अवलंबित्व वाढणार आहे.

तीन लाख ६५ हजार प्रवाशांची सोय

‘सीएनजी’च्या एका बसमधून दिवसाला सरासरी ७३० प्रवाशांची वाहतूक होते. ५०० बसच्या माध्यमातून दिवसाला किमान तीन लाख ६५ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. जागेअभावी अनेक प्रवाशांना दररोज उभे राहून प्रवास करावा लागतो. बसची संख्या वाढल्यास त्याचे प्रमाण कमी होईल.

भाडेतत्त्वावर व स्वमालकीच्या बस घेण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर बस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com