शिवभोजन योजनेसाठी ५६ केंद्रचालक उत्सुक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

चिंचवडमधून (अ विभाग) ३०, तर पिंपरीमधून (ज विभाग) २६ उपाहारगृहे आणि भोजनालय चालकांनी शिवभोजन केंद्र सुरू करण्याची तयारी दर्शविली असून, तसे अर्ज प्राप्त झाले आहेत. हे सर्व अर्ज शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
- डी. एन. तावरे, परिमंडळ अधिकारी, अन्न व पुरवठा कार्यालय

पिंपरी - राज्य सरकारची शिवभोजन योजना सुरू करण्यासाठी पिंपरी विभाग आणि चिंचवड विभागामधून उपाहारगृहे चालकांच्या उड्या पडल्या आहेत. सुमारे ५६ चालकांनी शिवभोजन केंद्र सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासंदर्भात शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. त्यात २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी वरण आणि १ मूद भात अशी थाळी केवळ १० रुपयांना मिळते. सध्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महापालिका उपाहारगृह आणि वल्लभनगर एस. टी. स्थानक अशा ४ केंद्रांवर ही योजना राबविली जात आहे. या चारही केंद्रांसाठी एकूण ५०० थाळी उपलब्ध करून दिल्या जात आहे.

एचए' कंपनीला 'असा' बसला कोरोनाचा फटका; 600 कोटींच्या कर्जाची मागणी

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत उपाहारगृहे किंवा भोजनालय चालकांकडे राखीव जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. एकाच वेळेस किमान २५ लोकांची व्यवस्था करावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत शिळे अथवा खराब अन्न दिले जाऊ नये. केंद्र सुरू करण्यासाठी आवश्‍यक शासकीय, निमशासकीय परवानग्या चालकांनी घेणे गरजेचे राहील. पोषक तत्त्वे असलेल्या भाज्यांची निवड केली जावी, केंद्र परिसरात स्वच्छता ठेवावी, ओला-सुका कचरा वेगळा केला जावा, आदी सूचना शासनाने केल्या आहेत. शिवभोजन केंद्रांचा आढावा घेतल्यावर नवीन केंद्रे सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर निर्णय होऊ शकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 56 Center Interested for ShivBhojan Yojana