या आजारामुळे 60 मेंढ्यांचा अचानक मृत्यू 

sheep
sheep

निरगुडसर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील वळती व जुन्नर तालुक्याच्या सीमेवरच असलेल्या मांजरवाडी येथे वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांच्या मेंढ्या जिवाणूजन्य (फ्रुट रॉट) या आजारामुळे मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या तीन दिवसांत जवळपास 60 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यातून मोठा फटका मेंढपाळांना बसत आहे. रांजणी (ता. आंबेगाव) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कड यांच्या पथकाने तातडीने उपचार करून शंभरहून अधिक मेंढ्यांचा जीव वाचवला आहे. 

वळती परिसरात नगर जिल्ह्यातील दगडू दळे, संतोष भोर व नरहरी शिंदे आणि मांजरवाडी येथे रामा ठवरे व सोनबा माने हे मेंढपाळ आपल्या शेकडो शेळ्या- मेढ्यांसह वास्तव्यास आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या मेंढ्यांचे पाय, कान, नाक व तोंडाला सूज येत असून, जंतुसंसर्ग झाल्याने खुरांना जखमा झाल्या आहेत. त्यातून रक्त येऊन त्यामध्ये दुर्गंधी येऊन अळ्या पडत आहेत. त्यामुळे लंगडत चालणे, ताप येणे व एकाच ठिकाणी झोपून रहाणे, अशा प्रकाराच्या लक्षणातून मेंढ्यांचा मृत्यू होत आहे.

वळती येथे तीन दिवसांत दगडू दळे यांच्या 10, संतोष भोर यांच्या 6, नरहरी शिंदे यांच्या 9; तर मांजरवाडी येथे रामा ठवरे यांच्या 20 व सोनबा माने यांच्या 15 मेंढ्या या अज्ञात रोगामुळे दगावल्या आहेत. मोठ्या प्रमाणात उपचार करून देखील शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू होत आहेत. त्यामुळे मेंढपाळांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

लसीकरण करा : डॉ. कड 
याबाबत डॉ. सुरेश कड यांनी सांगितले की, जिवाणूजन्य (फ्रुट रॉट) रोगामुळे पायाला जखमा होऊन 8 ते 10 दिवसात शेळी व मेंढीचा मृत्यू होतो. त्यामुळे या अचानक येणाऱ्या रोगापासून काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी जंतुनाशक प्रतिकार क्षमतेचे औषध देण्याबरोबर लसीकरण केले पाहिजे. शेळ्या- मेंढ्यांची बसण्याची जागा स्वच्छ ठेवावी. रोगाची लागण झालेल्या मेंढ्या एका बाजूला ठेवून औषधोपचार करावे. हिरवा चारा स्वच्छ द्यावा. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com