
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप शुक्रवारी संपुष्टात आला. पुणे विभागात शुक्रवारी अखेर ४,१६५ कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावली.
पुणे विभागामध्ये ६४० एसटी रस्त्यावर
पुणे - राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) कर्मचाऱ्यांनी (Employee) पुकारलेला संप (Strike) शुक्रवारी संपुष्टात आला. पुणे विभागात शुक्रवारी अखेर ४,१६५ कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावली. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही एसटीने (ST) वाट धरली आहे. एकाच दिवशी पुणे विभागाच्या ६४० बस (Bus) रस्त्यांवर धावल्या. अजूनही सुमारे दीडशे बसची दुरुस्ती विविध डेपो व विभागीय कार्यशाळांत सुरू आहे. दुरुस्ती पूर्ण होताच त्या देखील प्रवाशांच्या सेवेत धावतील.
मुंबई उच्च न्यायालयाने २२ एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यास सांगितले होते. त्यानुसार शेवटच्या दिवसापर्यंत कर्मचारी हजर होत राहिले. पुणे विभागाच्या एकूण ४१९५ कर्मचाऱ्यांपैकी ४१६५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यात १४८१ चालक तर १३८५ वाहक आहेत. केवळ ३० कर्मचारी कामावर येणे शिल्लक राहिले आहे. ६४० बसच्या माध्यमातून एसटी आपला ‘टॉप’ गियर टाकून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, त्याला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू होण्यास ५ मेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. पहिल्या दिवशी पुणे विभागाच्या ६४० बसने विविध मार्गांवर २१०० फेऱ्या केल्या. यातून २५ हजार किलोमीटरचा प्रवास केला. ८० हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने पहिल्या दिवशी ८५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.
पुणे विभागातील परिस्थिती
४१९५ - एकूण कर्मचारी
४१६५ - कामावर हजर
३० - गैरहजर
१४८१ - चालक
१३३८ - वाहक
८०२ - यांत्रिक
५४४ - प्रशासकीय
बस संख्या
९०३ - एकूण
८३० - प्रवासी
७३ - मालवाहतूक
६४० - सध्या वापरात
१९० - दुरुस्ती व अन्य कामे
पुणे विभागात बहुतांश कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्याआधारे प्रवासी सेवा पूर्ववत केली जात आहे. काही गाड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यादेखील प्रवासी सेवेत लवकरच दाखल होतील.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे
Web Title: 640 St Bus On Road In Pune Division
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..