थकबाकीदारांनी महावितरणचं ऐकलं; भरली १०० कोटींची थकबाकी!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

ज्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे, त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून वीजबिलांच्या थकीत रकमेचा भरणा करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे.

पुणे : आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून वीजग्राहकांशी मोबाईलद्वारे थेट प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना चालू आणि थकीत देयके भरण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील 68 हजार वीजग्राहकांनी आतापर्यंत 99 कोटी 61 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला असल्याचे समोर आले आहे. 

सुप्रीम कोर्टचा मोठा निर्णय! आता सुनावणीची ढकलगाडी थांबणार​

पुणे परिमंडलात लॉकडाऊनच्या मार्च, एप्रिल आणि मे तसेच जून महिन्यामध्ये वीजबिलांचा भरणा 50 टक्‍क्‍यांपर्यंत खालावला होता. त्यानंतर जुलैपासून वीजबिलांचा भरणा वाढला. सद्यस्थितीत पुणे परिमंडलामधील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक 11 लाख 65 हजार ग्राहकांकडे 794 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ज्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे, त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून वीजबिलांच्या थकीत रकमेचा भरणा करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे. यासोबतच वीजबिलांबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास त्याचेही निवारण करण्यात येत आहे. 

महावितरणच्या या योजनेला प्रतिसाद देत आतापर्यंत पुणे परिमंडलातील 68 हजार 300 थकबाकीदारांनी 99 कोटी 61 लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये पुणे शहरातील 26 हजार 725 ग्राहकांनी 43 कोटी 60 लाख, पिंपरी व चिंचवड शहरातील 16 हजार 900 ग्राहकांनी 23 कोटी 90 लाख आणि आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी व वेल्हे तालुक्‍यातील 24 हजार 700 ग्राहकांनी 32 कोटी 10 लाख रुपयांचा भरणा केला आहे. 

ओवैसींचं योगी आदित्यनाथांना चॅलेंज; 'तुम्ही योगी आहात हे २४ तासात सिद्ध करून दाखवा!'​

लॉकडाऊनमधील वीजबिलांबाबत शंका निरसन करण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत जूनपासून आतापर्यंत 97 वेबिनार आणि 115 मेळावे घेण्यात आले. तर 286 ठिकाणी ग्राहक मदत कक्ष स्थापन करण्यात आले. यामध्ये सुमारे 4 लाख 2 हजार वीजग्राहकांचे शंका समाधान करण्यात आले आहे. मात्र वीजबिलांचा आणि थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरण सध्या गंभीर आर्थिक संकटात आहे. अशा बिकट परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करून थकबाकी आणि चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

www.mahadiscom.in या वेबसाईट किंवा मोबाईल ऍपद्वारे तसेच इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा घरबसल्या करण्याची सोय महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 68 thousand arrears paid arrears of one hundred crores of MSEDCL