आंबेगाव तालुक्यात या कारणांमुळे वाढतोय कोरोनाचा धोका

डी. के. वळसे पाटील
Saturday, 8 August 2020

आंबेगाव तालुक्यात शनिवारी (ता. 8) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या 7 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 411 झाली आहे.

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात शनिवारी (ता. 8) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या 7 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 411 झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे प्रशासनासह गावकरीही चिंतेत पडले आहेत.

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर

घोडेगाव व मंचर या दोन शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. या दोन्ही गावातील मुख्य बाजारपेठा आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडून सतत उपाययोजना केल्या जात आहेत. पण, अनेक नागरिकांकडून सोशल डिस्टन्ससह अनेक नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळून येत आहे. तर, काहीजण लक्षणे जाणवत असतानाही तपासण्यासाठी रुग्णालयाकडे फिरकत नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आलेली आहे. लक्षणे जाणवणाऱ्या नागरिकांनी ताबडतोब खासगी किंवा सरकारी डॉक्टरांशी संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पोलिस बनून हाॅटेलमध्ये शिरले, जेवले अन्...

गंगापूर बुद्रुक येथे दोन, घोडेगाव व मंचर येथे प्रत्येकी एक, खडकवाडी येथे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मंचर उपजिल्हा रुग्णालय व भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये संशयित कोरोना रुग्णांचे नमुने घेतले जातात. त्यानंतर त्यांचे वय व आजाराची तीव्रता लक्षात घेऊन अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय व भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्ण पाठवले जातात. डॉक्टर परिचारिका यांच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जात आहे. रुग्ण आनंदित राहावेत म्हणून समुपदेशन करण्याचेही कामही काही डॉक्टरांकडून केले जात आहे. 264 जणांना करोना मुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 more corona patients in Ambegaon taluka