पुणे : ऍट्रोसिटीची भीती दाखवत उकळली 75 लाखाची खंडणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

  • खंडणीखोराविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : नामांकित डॉक्‍टरच्या मुलाविरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून डॉक्‍टरकडून तब्बल 75 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतरही खंडणीखोराने उर्वरित 55 लाख रुपयांच्या खंडणीसाठी डॉक्‍टरकडे तगादा लावल्याप्रकरणी खंडणीखोराविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मनोज अडसूळ-अत्रे (वय 45, रा. नवी पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डॉ.दीपक प्रभाकर रासने (वय 69, रा. तपोवन सोसायटी, पर्वती) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा डॉ.साहिल रासने यांच्याविरुद्ध एका महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात ऑक्‍टोबर 2019 मध्ये विनयभंगाची तक्रार दिली होती. या प्रकरणासंदर्भात मनोज अडसूळ याने फिर्यादीस तुमच्या मुलाविरुद्ध विनयभंग, ऍट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात, त्यास तीन ते दहा वर्षाची शिक्षा होऊ शकते, अशी धमकी देत त्यांच्याकडे एक कोटी तीस लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याने फिर्यादीला खोटे आश्‍वासन देऊन त्यांच्याकडून धनादेशाव्दारे 54 लाख व रोख रक्कम 21 लाख असे एकूण 75 लाख रुपये घेतले. त्यानंतर उर्वरित 55 लाख रुपयांची रक्कम न दिल्यास मुलास अटक होईल, अशी धमकी देत पैशांसाठी तगादा लावला होता.

कुमारस्वामींचा मुलगा अन् काँग्रेस नेत्याची भाची अडकणार लग्नाच्या बेडीत

दरम्यान, याप्रकरणी फिर्यादी यांनी जयेश कासट यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. मात्र अडसूळ याने कासट यांनीच आपल्याकडे पैसे मागितल्याची तक्रार खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे केल्याचे फिर्यादीच्या जबाबामध्ये नमूद केले आहे. या प्रकरणाच्या पडताळणीनंतर पोलिसांनी अडसूळविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 75 lakh Rs Ransom paid by Doctor due to Fearing atrocity