esakal | पुणे महापालिका रुग्णालयांसाठी ८०० रेमडेसिव्हिर

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हिर
पुणे महापालिका रुग्णालयांसाठी ८०० रेमडेसिव्हिर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या रुग्णालयांसाठी आवश्‍यक तेवढे रेमडेसिव्हिर इंजेक्शन जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध केले जात नसल्याने महापालिकेने थेट कंपनीकडूनच इंजेक्शन मिळविले आहेत. पहिल्या टप्प्यात ८०० इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. आणखी ३ हजार इंजेक्शन पुढच्या टप्प्यात येणार आहेत.

महापालिकेच्या जम्बो, नायडू, दळवी, बाणेर, लायगुडे या रुग्णालयांमध्ये रोज किमान २०० रेमडेसिव्हिरची आवश्‍यकता आहे, पण सरकारकडून दोन दिवसांसाठी एवढा साठा मिळत आहे. पालिकेला पुरेशा प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध व्हावेत अशी वारंवार मागणी करण्यात आली पण इंजेक्शन न मिळाल्याने अडचणी येत होत्या. त्यामुळे पालिकेने थेट कंपन्यांशी संपर्क साधून ८०० इंजेक्शन मिळवले आहेत. पुढे ज्युबिलियन या कंपनीकडून आणखी तीन हजार इंजेक्शन या आठवड्यात प्राप्त होतील. त्यामुळे रुग्णांना या इंजेक्शनचा तुटवडा यापुढे भासणार नाही, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा: गुदमरलेल्या पुण्यात व्हेंटिलेटर दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष

महापालिका शहरातील कोरोना बाधितांना आवश्यक असल्यास मोफत रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे़. त्यासाठी २५ हजार इंजेक्शन मिळविण्यासाठी कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. त्यासाठी कंपन्यांना आगाऊ पैसे देण्याचीही तयारी केली आहे, असे रासने यांनी सांगितले.

''खासगी रुग्णालयातील रुग्णांनाही इंजेक्शन मिळत नाहीत, त्यामुळे त्यांनाही मोफत इंजेक्शन दिले जातील. ज्या कोरोनाबाधित रुग्णाची ऑक्सिजन पातळी ९३ पेक्षा कमी व ‘एचआरसीटी’ स्कोर १० च्या पुढे असेल अशा रुग्णांनाच ही मदत मिळेल.''

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका

हेही वाचा: पुण्यात हवाईदलाकडून ऑक्सिजन वाहतूक