
अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशीद जमीन मालकीच्या वादाबाबत शनिवारी सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यादृष्टीने पुणे पोलिसांनी तब्बल नऊ हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणी जादा कुमक
पुणे - अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशीद जमीन मालकीच्या वादाबाबत शनिवारी सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यादृष्टीने पुणे पोलिसांनी तब्बल नऊ हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अयोध्या रामजन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणाबाबत अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून दिला जाणार आहे. सकाळी साडेदहापासून त्यास सुरवात होईल. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर कोणत्याही समाजघटकांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, त्याद्वारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून काही दिवसांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत.
याविषयी डॉ. शिसवे म्हणाले, ‘‘निकालाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी समाजघटक व त्यांच्या नेत्यांच्या बैठका घेऊन, त्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात येणार आहे. शहरात विविध प्रकारचे उत्सव, निवडणुकीप्रमाणेच शनिवारीही तब्बल ९ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांच्या सर्व शाखा बंदोबस्तामध्ये कार्यरत असतील. काही संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तिथेही जादा बंदोबस्त ठेवला आहे. निकालावर कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटणार नाहीत, याचीही काळजी घेण्यात आली आहे.’’
पोलिसांच्या सुट्या रद्द
निकालाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत; तर सुटीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलविण्यात आले आहे. सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासूनच कार्यरत राहणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले.
पोलिसांच्या सूचना
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून मागील काही दिवसांपासूनच काही समाजघटकांच्या सातत्याने बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये न्यायालयाच्या निकालाचा मान राखून कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शांतता समितीची बैठक
पुणे - राम जन्मभूमी- बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणाच्या निकालाचा सर्वांनी आदर ठेवून शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राम आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. नागरिकांनी सोशल मीडियासंदर्भात दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस पिंपरी- चिंचवडचे पोलिस सहआयुक्त प्रकाश मुत्याळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.