कॉसमॉस बॅंकेवर 94 कोटींचा ऑनलाईन दरोडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

भारतासह 29 देशांमधील एटीएममधून रक्कम काढली

भारतासह 29 देशांमधील एटीएममधून रक्कम काढली
पुणे - शहरातील नामांकीत कॉसमॉस बॅंकेच्या पुण्यातील मुख्यालयात असलेले "एटीएम सर्व्हर स्विच' (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सनी तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये इतकी प्रचंड रक्कम भारतासह 29 देशांमधील एटीएममधून रोख आणि ऑनलाईन स्वरुपात काढली. हा धक्कादायक प्रकार अवघ्या 44 तास आणि 30 मिनिटांत घडला. कोट्यवधी रुपये पळविण्याच्या या ऑनलाईन दरोड्याची बातमी मंगळवारी सकाळी धडकताच अवघ्या बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली. त्यामध्ये प्रामुख्याने हॉंगकॉंगमधील हेनसेंग या बॅंकखात्यामध्ये 13 कोटी 92 लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन वर्ग केल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सुहास सुभाष गोखले (वय 53, रा. पिनॅक पारिजात, कर्वे रस्ता) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गणेशखिंड येथे कॉसमॉस बॅंकेचे भारतातील मुख्यालय आहे. मुख्यालयातील एटीएम स्विच हे बॅंकेचे ऑनलाईन व्यवहाराशी निगडित सर्व्हर आहे. शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून ते सोमवारी दुपारी साडेअकरा या वेळेत बॅंकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरुन 94 कोटी 42 लाख इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने चोरली. या रकमेवर ए.एल.एम ट्रेडिंग लिमिटेड या कंपनीसह काही अनोळखी व्यक्तींनी डल्ला मारला आहे.

व्हिसाच्या 12 हजार व्यवहारांची 78 कोटी रुपयांची रक्कम भारताबाहेर काढली गेली आहे. तर रुपेचे 2 हजार 849 इतक्‍या व्यवहारांची अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतात काढण्यात आली आहे. एकूण 14 हजार 849 व्यवहारांची 80 कोटी 50 लाख रुपये इतकी ही किंमत आहे. व्हिसा व एनपीसीआय यांनी पाठवलेल्या "ट्रान्जॅक्‍शन' या "रिक्वेस्ट व्हिसा' व एनपीसीआय यांना सदर व्यवहार बॅंकेने मंजूर केल्याचे भासवून अनोळखी व्यक्तींनी ही रक्कम एटीएममधून काढून घेतली. याबरोबरच शनिवारी "स्विफ्ट ट्रान्झॅक्‍शन' तयार करून हॉंगकॉंगमधील हेनसेंग या बॅंकेतील ए.एल.एम ट्रेडिंग लिमिटेड या खात्यावर 13 कोटी 92 लाख रुपये वर्ग करून ते काढण्यात आले. या पद्धतीने 94 कोटी 42 लाख रुपयांची बॅंकेची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले.

बॅंकेची मोठी रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. चतुःशृंगी पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकार व्यवहार संख्या काढलेली रक्कम
* व्हिसा - 12 हजार - 78 कोटी
* रुपे - 2449 - अडीच कोटी
* स्विफ्ट ट्रान्झॅक्‍शन - 3 - 13 कोटी 92 लाख
एकूण - 94 कोटी 42 लाख

Web Title: 94 Crore Online Robbery on Cosmos bank