esakal | एकीमुळे जिंकली लढाई; बांधकाम व्यावसायिकामुळे ९४ मजूरांची कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

 बांधकाम मजूर
एकीमुळे जिंकली लढाई; बांधकाम व्यावसायिकामुळे ९४ मजूरांची कोरोनावर मात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘एकी हेच बळ’ या म्हणीची प्रचिती देणारे प्रेरणादायी उदाहरण बांधकाम क्षेत्रातून समोर आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या एका प्रकल्पावरील दोन ते तीन मजूरांना ताप आल्याचे निमित्त झाले. त्याची तत्काळ दखल घेऊन बांधकाम व्यावसायिकाने शहरात सुरू असलेल्या चारही साईडवरील सुमारे ३०० कामगारांची तपासणी केली असता ९४ मजूर बाधित असल्याचे आढळून आले. खासगी डॉक्टर, लॅब, महापालिका प्रशासन आणि मित्र परिवाराच्या मदतीने तातडीने उपचार सुरू झाले, आज सर्व मजूर ठणठणीत आहेत.

वेळेत तपासणी करून उपचार सुरू केले, तर कोरोनावरही मात करता येऊ शकते. त्यांचे हे उदाहरण. विशेष म्हणजे हे सर्व बांधकाम मजूर छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बिहार येथील आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने संचारबंदी लागू केली आहे. त्यामध्ये प्रकल्पाच्या ठिकाणी राहण्याची सोय असलेल्या बांधकाम व्यावसायिकांना काम सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार दिलीप कोटीभास्कर यांची शहरातील चार भागात बांधकामे सुरू आहेत. या सर्व ठिकाणी मिळून सुमारे ३०० मजूर काम करीत आहेत.

हेही वाचा: कोविड केअर सेंटरची सुरक्षा 'राम भरोसे'; पाहणीविनाच परवानगी

दहा दिवसांपूर्वी एका प्रकल्पावरील दोन ते तीन मजुरांना ताप आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी त्यांचे फॅमिली डॉक्टर डॉ मोहन गांधी यांचा सल्ला घेऊन त्या मजुरांची तपासणी केली. ते कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने अन्य मजुरांमध्ये घबराट पसरली. परंतु बाधितांवर तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करून ते थांबले नाही, तर त्यांनी अन्य बांधकाम प्रकल्पावरील मजुरांच्या तपासणीचा निर्णय तत्काळ घेतला. त्यासाठी खासगी लॅबच्या मदत घेऊन सर्वच प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या सर्व बांधकाम मजुरांची तपासणी केली. तेव्हा चार प्रकल्पाच्या ठिकाणी असलेले सुमारे ९४ बांधकाम मजूर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले

महापालिकेच्या यंत्रणेची तत्परता

बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि डॉ. संजीव वावरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची कल्पना दिली. तर बांधकाम व्यावसायिक नितीन देशपांडे यांनी सहायक आयुक्त नितीन उदास यांच्याशी संपर्क साधला. तातडीने महापालिकेची यंत्रणा हालली आणि त्या सर्व बांधकाम मजूरांना विश्रांतवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पीएमपीने देखील बस उपलब्ध करून दिली. आज सर्व बांधकाम मजूर ठणठणीत आहेत.

हेही वाचा: पुणे महापालिका रुग्णालयांसाठी ८०० रेमडेसिव्हिर

''संघटनेच्या वतीने सर्व सभासदांना बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांची काळजी घेण्याची सूचना यापूर्वी दिल्या आहेत. त्यानुसार आमचे सभासद काळजीही घेत आहेत. महापालिकेकडून देखील आम्हाला सर्व सहकार्य मिळत आहेत. एकत्र येऊन लढा दिला, तर नक्कीच कोरोनाच्या संकटातून आपण सगळे बाहेर पडू शकतो, हेच यातून दिसून आले आहे.''

- ज्ञानेश्‍वर ऊर्फ नंदू घाटे, अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना