esakal | कोविड केअर सेंटरची सुरक्षा 'राम भरोसे'; पाहणीविनाच परवानगी

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर
कोविड केअर सेंटरची सुरक्षा 'राम भरोसे'; पाहणीविनाच परवानगी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाहीत म्हणून रुग्णालये आणि संस्था एकत्र येऊन कोविड केअर सेंटर सुरु करत आहेत. मात्र सेंटर सुरू करताना जागेवर जाऊन पाहणी न करता थेट अग्निशामक दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात येत असल्याने या केंद्रांची आणि रुग्णांची सुरक्षा रामभरोसे असल्याचा प्रकार समोर आला आहे. सेंटरला तातडीने मान्यता मिळावी म्हणून आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर नगरसेवक, आमदारांचा दबाव येत आहे.

आपल्या प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचा हट्ट नगरसेवक धरत आहेत. आता खासगी रुग्णालयांना सोबत घेऊन सेंटर सुरू करण्याचा सुळसुळाट सुरू झाला आहे. नाशिक येथे अॅक्सिजनच्या टाकीचा स्फोट होऊन २२ जणांचा मृत्यू झाला, तर विरार येथे आगीमध्ये रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटना ताजा असताना याकडे साफ दुर्लक्ष करून केंद्र सुरू करण्याचा सपाटा लावला आहे.

हेही वाचा: पुणे महापालिका रुग्णालयांसाठी ८०० रेमडेसिव्हिर

केंद्र सुरू करताना अग्निशामक दलाची एनओसी, पोलिसांची एनओसी आवश्यक आहे. अग्निशमन यंत्रणा बसविली आहे का, रुग्ण संख्येच्या तुलनेत ती पुरेशी आहे का, याची पाहणी न करता राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली एका दिवसात परवानगी दिली जात आहे. यास अग्निशामक दलातील काही अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.

''कोविड सेंटर सुरू करताना संस्थांनी फायर एनओसी घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे त्यांनी तेथे उपाययोजना करणे अपेक्षित आहे. तेथे त्यांनी काय सुविधा केल्या आहेत, हे तपासणी अहवालातून स्पष्ट होईल. तसेच रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही.''

-प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशामक दल, पुणे महापालिका

हेही वाचा: गुदमरलेल्या पुण्यात व्हेंटिलेटर दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष

नगरसेवकांचा अट्टहास

नगरसेवकांनी लसीकरण केंद्र सुरू केल्यानंतर आता कोविड सेंटरकडे मोर्चा वळविला आहे. प्रभागातील लहानमोठ्या खासगी रुग्णालयांना सोबत घेऊन हे केंद्र सुरू केले जात आहेत. यामध्ये यंत्रणा खासगी रुग्णालयांची आणि नाव पुढाऱ्यांचे आहे. कमी पैसे घेऊन उपचार केले जातात असे सांगितले जात असले तरी यातून प्रसिद्धी व पैसा दोन्ही गोष्टी मिळत आहेत.

हेही वाचा: पुण्यात हवाईदलाकडून ऑक्सिजन वाहतूक

पुण्यातील आरोग्य सुविधा

खासगी कोविड सेंटर - १९

ऑक्सिजन बेड -२६७

व्हेंटिलेटर बेड -२

आयसीयू बेड -७०

ऑक्सिजनविरहित बेड - ४६६

आयसोलेशन बेड -६१५

हेही वाचा: पुण्यात लशींअभावी आज केंद्र बंद