बारामतीच्या डॉक्टरांच्या टीमने महिला व बाळाला दिले जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

बारामतीच्या डॉक्टरांच्या टीमने महिला व बाळाला दिले जीवदान

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : ...एकीकडे फुफ्फुसामध्ये कमालीचा संसर्ग झालेला आणि दुसरीकडे गर्भवती असलेल्या महिलेला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचे काम बारामतीतील डॉक्टरांनी यशस्वीपणे केले. आई व बाळ या दोघांनाही मोठ्या कौशल्याने जीवदान देण्यात त्यांना यश मिळाले. बारामतीतील डॉ. विशाल मेहता यांच्या मेहता हॉस्पिटलमध्ये व्हेंटीलेटरवर असलेल्या कोरोनाबाधित गर्भवती महिलेची प्रसूती हे अशक्यप्राय काम ठरत होते. मात्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुनील ढाके, डॉ. टेंगले, डॉ. अनुराधा भोसले, डॉ.सुजित अडसूळ, डॉ. निकीता मेहता, डॉ. अमित कोकरे, डॉ. अमोल भगत, डॉ. हर्षा जाधव यांच्या टीमने चर्चा करुन हे आव्हान स्विकारायचा निर्णय घेतला.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात रेशनवर २४ हजार टन धान्याचे मोफत वितरण

एकीकडे फुफुसात संसर्ग झालेला, कोरोनाची तीव्रता कमालीची, एचआरसीटीचा स्कोअर तब्बल 25 असे असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करणे कमालीच्या धोक्याचेच होते. मात्र कुटुंबियांना विश्वासात घेत डॉ. विशाल मेहता यांनी हा धोका पत्करला. हे अवघड काम करताना त्यांनी के.ई.एम. हॉस्पिटलचे डॉ. विवेक जोशी, डॉ. हर्षवर्धन व्होरा,.डॉ. शुभांगी वाघमोडे, .डॉ. आनंद गवसणे यांचा सल्ला व मार्गदर्शन घेतले. सर्वांनी एकत्र चर्चा करुन मग संबंधित महिलेची प्रसूती केली. या अठ्ठावीस वर्षीय महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

हेही वाचा: स्मार्ट चौकात वाहतूक बेटाऐवजी पिंप! 

एकीकडे तिचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित तिलाही खोकला, ताप अशी लक्षणे होती, त्यात तिचे दिवसही भरलेले होते. फुफुसात संसर्गासोबतच ऑक्सिजनची पातळीही खालावली होती. उपचार सुरु केल्यानंतर महिलेला व्हेंटीलेटरवर घ्यावे लागले. पण फार थांबले असते तर बाळाच्या जिवालाही धोका निर्माण झाला असता, सर्व बाबींचा विचार करुन शेवटी डॉ. मेहता व टीमने निर्णय घेत प्रसूती केली. सर्वच डॉक्टरांना यात कोरोना संसर्गाचाही मोठा धोका होता, मात्र आई व बाळाच्या जिवाला प्राधान्य देत त्यांनी हे काम करुन दाखविले. आई व्हेंटीलेटरवर असताना हे ऑपरेशन केले गेले. विशेष म्हणजे आई बाधित असताना बाळ मात्र कोरोना निगेटीव्ह होते. प्रसूतीनंतरही संबंधित महिला जवळपास 13 दिवस व्हेंटीलेटरवर होती, मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे ती या परिस्थितीतून बाहेर आली व नुकताच तिला डिस्जार्ज देण्यात आला. बारामतीत असलेल्या आवश्यक वैद्यकीय सुविधा व डॉक्टरांचे कौशल्य या मुळेच आई व बाळाचे प्राण वाचू शकल्याची प्रतिक्रीया कुटुंबियांनी व्यक्त केली.

loading image
go to top